ऑस्ट्रेलिया: भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित समारंभात खलिस्तानी समर्थकांनी घातला गोंधळ

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर भारताच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित समारंभात खलिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातला. ‘द ऑस्ट्रेलिया टुडे’च्या वृत्तानुसार, भारतीय समुदाय शांततेने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी दूतावासाबाहेर जमला असताना खलिस्तानी झेंड्यांसह आलेल्या टोळक्यांनी समारोहात व्यत्यय आणला. यावेळी खलिस्तानी समर्थकांनी भारतीय समुदायाशी वाद घालण्याचा प्रयत्नही केला.
‘द ऑस्ट्रेलिया टुडे’च्या माहितीनुसार, भारतीय नागरिक दूतावास परिसरात शांततेने स्वातंत्र्य दिन साजरा करत होते. याचवेळी काही खलिस्तानी समर्थकांनी अचानक गोंधळ सुरू केला. त्यांनी समारंभात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात दोन्ही गटांमधील तीव्र शाब्दिक चकमक दिसून येते. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
खलिस्तानी समर्थकांनी खलिस्तान समर्थक घोषणा दिल्या, तर भारतीय समुदायाने देशभक्तीपर गीते गाऊन त्याला प्रत्युत्तर दिले. अखेरीस ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांमध्ये दूतावासात तिरंगा फडकवण्यात आला.
ऑस्ट्रेलियात खलिस्तानी हिंसाचारात वाढ-
स्वातंत्र्य दिनावरील हा गोंधळ ऑस्ट्रेलियात खलिस्तानी समर्थकांच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर घडला आहे. गेल्या महिन्यात बोरोनिया येथील स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला करून तोडफोड केली होती. मंदिराबरोबरच जवळील दोन आशियाई रेस्टॉरंट्सवरही भडकावणारी भित्तीचित्रे आढळली.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी भारताला ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. “जगभरात तिरंगा अभिमानाने फडकत असताना, भारतीय आपल्या देशाच्या ७८ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करत आहेत,” असे त्यांनी म्हटले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्री आणि परस्पर आदरावर आधारित दृढ संबंधांवर त्यांनी भर दिला. तसेच, भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायाचे कौतुक केले.
पोलिसांचा हस्तक्षेप, परिस्थिती नियंत्रणात-
घटनास्थळी ऑस्ट्रेलियन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे पुढील अनुचित प्रकार टळले. भारतीय समुदायाने शांतता राखत आपला उत्साह आणि देशभक्ती कायम ठेवली.
या घटनेमुळे ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायात संतापाची लाट पसरली असून, खलिस्तानी समर्थकांच्या वाढत्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.





