बॉक्सिंग डे कसोटी : ऑस्ट्रेलिया 7 बाद 155

मेलबर्न – आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात येथील प्रतिष्ठेच्या “बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व निर्माण झाले आहे. उपहार ते चहापान दरम्यानच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या 7 गडी बाद 155 धावा झाल्या असून त्यांचे सर्व प्रमुख फलंदाज तंबूत परतले आहेत.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, विराट कोहली भारतात परतल्यानंतर भारताची धुरा वाहणाऱ्या अजिंक्य रहाणेने गोलंदाजीत कल्पक आणि आश्चर्यकारक बदल करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. सर्वप्रथम जसप्रित बुमराहच्या गोलंदाजीवर सलामीवीर ज्यो बर्न्स यस्टीरक्षक ऋषभ पंतकडे झेल देऊन परतला. बर्न्सला खातेही उघडता आले नाही.
मग रहाणेने अचानकपणे रविचंद्रन आश्विनकडे चेंडू दिला आणि कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत आश्विनने मॅथ्यु वेडला रविंद्र जाडेजाकरवी झेलबाद करत दुसरी विकेट मिळवली. वेडने 30 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सर्वात भरवशाच्या आणि आक्रमक अशा स्टीव्हन स्मिथने आश्विनचा चेंडू ग्लान्स केला आणि चेतेश्वर पुजाराने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक लो कॅच पकडला. स्मिथलाही खातेसुद्धा उघडता आले नाही.
मग मार्नस लेबुशेन आणि ट्रॅविह्स हेडने जास्त पडझड होऊ दिली नाही. पण पदार्पण करत असलेल्या मोहम्मद सिराजने मार्नस लेबुशेनला चकवले. सिराजचा ग्लान्स केलेला चेंडू शुभमन गिलने उजवीकडे झेपावत टिपला. लेबुशेनने 4 चौकारांसह 48 धावा केल्या. त्याने ट्रॅव्हिस हेडसमवेत 86 धावांची भागिदारीही केली. लाबुशेन परतल्यानंतर बुमराहच्या गोलंदाजीवर रहाणेने हेडला गलीमध्ये झेलले. हेडने 38 धावा केल्या. त्यापाठोपाठ मोहम्मद सिराजने कॅम्रुन ग्रीनला 12 धावांवर पायचित पकडले. तर कर्णधार टीम पेनचा झेल हनुमा विहारीने आश्विनच्या गोलंदाजीवर घेतला. पेनने 13 धावा केल्या.





