Australia A vs India A, 1st unofficial Test: मॅके येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने सध्याच्या दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियासमोर 225 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, जे त्यांनी सहज गाठले, त्यादरम्यान त्यांनी केवळ 3 विकेट गमावल्या.भारतीय बॉलिंग लाइनअपने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यासाठी संघर्ष केला,खूप प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले ज्यामुळे संघाचा पराभव झाला.
सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. अभिमन्यू इसवरन, रुतुराज गायकवाड, इशान किशन आणि नितीश रेड्डी या प्रमुख खेळाडूंना महत्त्वपूर्ण योगदान देता आले नाही, ज्यामुळे संपूर्ण संघ अवघ्या 107 धावांवर बाद झाला.ऑस्ट्रेलियासाठी ब्रेंडन डॉगेटने अप्रतिम गोलंदाजी करत आपल्यी स्पेलमध्ये 6 बळी घेतले.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 195 धावा केल्या आणि 88 धावांची आघाडी घेतली.खराब सुरुवात करूनही दुसऱ्या डावात काही भारतीय फलंदाज फॉर्ममध्ये परतले. युवा साई सुदर्शनने ऑस्ट्रेलियन आक्रमणाचा सामना करत 200 चेंडूत 103 धावांची शानदार खेळी केली.देवदत्त पडिक्कलनेही 199 चेंडूत 88 धावा करत प्रभावित केले. हे दोन्ही फलंदाज अखेर टॉड मर्फीचे बळी ठरले. इशान किशनने 32 आणि नितिश रेड्डीने 17 धावा केेेेेेल्या.या फलंदाजांच्या जोरावर भारताने 312 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 225 धावांचे लक्ष्य ठेवले.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं 225 धावांचे लक्ष्य सहज गाठले, त्यादरम्यान त्यांनी केवळ 3 विकेट गमावल्या. कर्णधार नॅथन मॅकस्विनी आणि ब्यू वेबस्टर यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर खंबीरपणे उभे राहिले. दोघांनीही चांगली फलंदाजी केली आणि शेवटपर्यंत नाबाद राहिले, मॅकस्वीनीने 88 आणि वेबस्टरने 61 धावा केल्या आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.