Jambarung-Thakurwadi : २० वर्षांपासून रखडलेल्या जांबरुंग-ठाकूरवाडीच्या रस्त्याला मुहूर्त
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २ कोटी ५७ लाखांचा निधी; अडीच किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू

खालापूर – जांबरुंग-ठाकूरवाडी परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी २ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुमारे अडीच किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून काही काम पूर्णत्वास गेले आहे.
जांबरुंग गावापासून ठाकूरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे अधिकच कठीण होत होते.
शालेय विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना दररोज या समस्येचा सामना करावा लागत होता. त्यामुळे रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती.
नागरिकांची समस्या लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
शिवसेना खालापूर तालुकाप्रमुख प्रशांत खांडेकर यांनीही या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने अडीच किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.
तब्बल दोन दशकांनंतर रस्त्याला नवसंजीवनी मिळत असल्याने जांबरुंग-ठाकूरवाडी परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नवीन काँक्रिट रस्त्यामुळे प्रवास अधिक सुखकर होणार असून परिसरातील दळणवळणालाही चालना मिळणार आहे.
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे कौतुक केले. तसेच कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत खांडेकर यांचेही आभार मानले.
‘जांबरुंग गावापासून जांबरुंग ठाकूरवाडीकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांच्या विळख्यात सापडला होता. या रस्त्याची दुरुस्ती होणे अत्यंत महत्त्वाचे होते. माजी उपसरपंच प्रशांत खांडेकर यांनी यासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी भरीव निधी मिळाला असून काम प्रगतीपथावर आहे.’ – शिल्पा खांडेकर, सरपंच.
Bhor : भाटघर धरणक्षेत्रातील विद्युत पोल, डीपी हटविण्याची मागणी





