Auqib Nabi Century : औकिब नबी ठरला ‘गेम चेंजर’! ९० धावांत ७ विकेट्स पडल्यानंतरही ठोकलं ऐतिहासिक शतक

Auqib Nabi Century in Vijay Hazare Trophy 2026 : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या हंगामात जम्मू-काश्मीरच्या औकिब नबीने क्रिकेट विश्वाला थक्क करणारी कामगिरी केली आहे. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, औकिबने केवळ चेंडूनेच नव्हे तर बॅटनेही चमत्कार केला. पराभवाच्या छायेत असलेल्या जम्मू-काश्मीरला त्याने एकहाती विजय मिळवून देत इतिहास रचला आहे.
आधी गोलंदाजीत अन् नंतर फलंदाजीतही चमकला –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ५० षटकांत २६८ धावांचे आव्हान उभे केले होते. औकिब नबीने गोलंदाजी करताना १० षटकांत ५६ धावा देऊन ३ महत्त्वाचे बळी टिपले. मात्र, खरा थरार अजून बाकी होता.
🏟 AUQIB NABI — AN ALL-TIME CLASSIC FOR J&K
– CHASE OF 269
– J&K AT 90/7
– AUQIB NABI 114* (82)
– 10 FOURS • 7 SIXESFROM COLLAPSE TO VICTORY — PURE ICE 🥶 #AuqibNabi pic.twitter.com/Wx6HWTKTY1
— Rahul Yadav (@RahulYadav61762) January 8, 2026
हार मानली होती, पण नबी नावाचे वादळ आले!
२६९ धावांचा पाठलाग करताना जम्मू-काश्मीरची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. अवघ्या ९० धावांवर ७ गडी बाद झाले होते आणि संघ पराभवाच्या उंबरठ्यावर होता. अशा वेळी औकिब नबी खेळायला आला आणि त्याने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.
औकिबने अवघ्या ८२ चेंडूत नाबाद ११४ धावा कुटल्या. या झंझावाती खेळीत त्याने १० चौकार आणि ७ गगनभेदी षटकार लगावले. त्याला ९ व्या क्रमांकावर आलेल्या वंशज शर्माने (नाबाद ६९ धावा) मोलाची साथ दिली. या दोघांच्या भागीदारीमुळे जम्मू-काश्मीरने ४७.५ षटकांतच विजय मिळवला.
कारकिर्दीतील पहिलेच ‘स्पेशल’ शतक –
विशेष म्हणजे, याआधी ३५ लिस्ट-ए सामन्यांमध्ये औकिबला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. मात्र, आज त्याने थेट शतक ठोकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ही खेळी त्याच्यासाठी आणि जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरली आहे.
दिल्ली कॅपिटल्सला लागली मोठी लॉटरी!
औकिब नबीच्या या कामगिरीमुळे आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघ चांगलाच खुश असेल. लिलावात दिल्लीने औकिब नबीला ८.४ कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात सामील केले आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच औकिबने आपल्या अष्टपैलू खेळाची झलक दाखवून दिली आहे.





