औंध : पूल मोठा; रस्ता मात्र छोटा

औंध-औंध येथील भाले चौकाजवळील जुना पूल पाडून त्या ठिकाणी मोठा पूल बांधण्यात आला. परंतु, हा पूल बांधताना औंध बाजूने या पुलाकडे येणारा रस्ता छोटा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुलावरून येणारी वाहने छोट्या रस्त्यामुळे अडकून पडत आहेत. पूला बरोबर रस्तादेखील मोठा करण्यात आला असता तर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला नसता. या पुलावरून वाहतूक सुरू करण्यापूर्वी पुलापर्यंत येणारा रस्ता मोठा करण्याचे वाहतूक पोलिसांनी महानगरपालिकेस कळवले होते. परंतु, महानगरपालिकेने रस्ता मोठा करण्याआधीच पूल वाहतुकीसाठी खुला केल्याने वाहतूक पोलिसही या चौकाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
यामुळे या चौकामध्ये संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाल्यावर परिसरात छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करतात. या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील उद्योग-व्यवसायांवरही परिणाम होत आहे.
पिंपरी-चिंचवड बाजूने बाणेर, पाषाण बाजूस जाणारे वाहनचालक भाले चौकाचा वापर करतात. बाणेर वरून औंध येथे येण्यासाठीही या चौकातून यावे लागते. या परिसरात वेस्टन मॉल, रिलायन्स मॉल, डी-मार्ट असल्यामुळे सतत मोठी गर्दी असते, त्यामुळे हा चौक वाहतूक कोंडीने गुदमरतो आहे. बाणेर रोडवर मेट्रोच्या कामास सुरूवात झाली आहे, हे काम वेगाने सुरू झाल्यास बाणेर रोड वरील वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजे भाले चौका मधूनच वळवावी लागणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर या परिसरामधील रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे, असे व्यावसायिक व नागरिकांचे म्हणणे आहे.
वाहतूक कोंडीचा परिणाम व्यावसायावर झाला आहे. आधीच दोन वर्षे करोना साथीमध्ये गेल्याने व्यवसायाची मोठी दुर्दशा झाली आहे. त्यातच आता कुठे व्यवसाय रुळावर येत आहे. परंतु, भाले चौकामध्ये वाहतूक कोंडी होत असल्यामुळे ग्राहकही कम झाले असून व्यवसायावर याचा परिणाम होत आहे. वाहतूक कोंडी झाल्यावर आम्हाला आमचा व्यवसाय सोडून ही वाहतूक कोंडी सोडवावी लागत आहे. – विकास जूनवणे, स्थानिक व्यावसायिक
नवीन केलेल्या पुलावरील रस्ता मोठा आहे, तोच रस्ता पुढे भाले चौकाच्या दिशेने आल्यावर छोटा होत असल्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होते. रस्ता मोठा करण्याबाबत महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पालिकेने देखील याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. रस्ता मोठा झाल्यास या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही.
– प्रकाश मासाळकर, पोलीस निरीक्षक, सप्तशृंगी पोलीस स्टेशन





