ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान : उद्धव ठाकरे

मुंबई : ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या या मैदानाचे नुसते नूतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारे स्मारक उभारावे. इतिहास जिवंत ठेवणे व तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.
मुंबईतील आझाद क्रांती मैदानात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त “आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बंदरे व वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रवीण दरेकर उपस्थित होते.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक सत्यबोध नारायण सिंगीत, शहीद स्क्वाड्रन लीडर मनोहर राणे यांच्या वीर पत्नी माधुरी मनोहर राणे, हवालदार मधुसूदन नारायण सुर्वे तसेच प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त कु. काव्या कार्तिकेयन यांचा सत्कार करण्यात आला.
उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्यात हा उत्सव सुरु होत आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वसामान्य जनतेने जातपात, धर्म यापलीकडे जाऊन देशाप्रती भावना दाखविली. अनेकांनी कुर्बानी पत्करली. त्यांचे हौतात्म फक्त आठवण करून भागणार नाही, तर ज्यांनी आपले आयुष्य घालवले त्यांना अभिमान वाटेल असा देश उभा करता येईल का, स्वराज्याबरोबरच सुराज्य आणू शकतो का हा विचार व्हावा.
थोरात म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यात आजच्या दिवशी 12 मार्च 1930 रोजी सुरू झालेल्या मीठाच्या सत्याग्रहाने वातावरण निर्माण केले. या लढ्यात महात्मा गांधींच्या रुपाने सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारे सर्वसमावेशक नेतृत्व निर्माण केले. महात्मा गांधींनी दिलेल्या अहिंसा, असहकार चळवळीचे प्रशिक्षण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली राज्यघटना यांना सोबत घेऊन आपल्याला देशातील लोकशाही समर्थ करावी लागणार आहे. लोकशाही टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
सन 1942 च्या लढ्याचा पाया मीठाच्या सत्याग्रहाने रचला. स्वातंत्र्यलढ्यात मुंबईचे महत्त्वाचे स्थान आहे. ऑगस्ट क्रांती मैदान त्यातील एक केंद्रबिंदू आहे. या मैदानात स्वातंत्र्याचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.




