Pune District : संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री महागणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट
Pune District : दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला.

रांजणगाव गणपती : संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. यावेळी श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर परिसरासह गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. या सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.
भाविकांसाठी विशेष सोयी-सुविधा
संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने जलद दर्शन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि खिचडी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी दिली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा सौ. स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबनीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके, देवस्थानचे कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.





