दखल : शाळेत अमली पदार्थांचा शिरकाव

– डॉ. मिलिंद भोई
शालेय जीवनातील मुलामुलींपर्यंत आता अमली पदार्थांनी शिरकाव केला आहे. शाळकरी मुलांना अमली पदार्थांचा विळखा घट्ट बसण्याअगोदर तो सोडवणे गरजेचे बनले आहे. या विदारक समस्येबाबत…
अमली पदार्थांचा तरुणाईला पडलेला विळखा ही अतिशय गंभीर बाब असून, दुर्दैवाने त्याचा प्रसार आता शालेय जीवनाकडे होत आहे ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. यासाठी शासन, पोलीस यंत्रणा, पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमे या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. गुटखा, तंबाखू, सिगारेट या व्यसनातून सुटका होणे कष्टसाध्य आहे; पण अमली पदार्थांपासून सुटका होणे हे अतिशय दुर्मिळ आहे.
अगदी पान मसाला, मावा, तंबाखू, जर्दा, व्हाइटनर, पेट्रोल-डीझेलचा वास घेणे, विशिष्ट प्रकारची खोकल्याच्या औषधांचे सेवन, विक्स आयोडेक्स यांसारखे पदार्थ ब्रेडला लावून खाणे यापासून सुरू होणारा प्रवास हा नकळत गांजा, अफू, भांग, कोकेन, मोर्फिन, एलएसडी, ब्राउन शुगर, मेफेड्रोन, हेरोइन इथपर्यंत कधी पोहोचतो हे कळत नाही.
पूर्वी महाविद्यालयीन वयात याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत होता; पण, दुर्दैवाने आता शालेय वयामध्ये याने शिरकाव केला आहे. यासाठी नक्की काय करावे या विचारात शिक्षक, पालक, समुपदेशक, डॉक्टर्स यांनासुद्धा प्रश्न पडला आहे. आई-वडील जर सिगारेट, तंबाखू अशी व्यसने करत असतील किंवा घरात येणारी काम करणारी बाई जर तंबाखू किंवा मिश्री लावत असेल तर घरातील लहान मुलांमध्ये लहान वयातच या गोष्टींबद्दल आकर्षण निर्माण होते.
एकलकोंडेपणा वाढणे, स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेणे, विशिष्ट वेळेस बाहेर जाण्यासाठी धडपडणे, पालक आणि शिक्षक यांच्याशी उद्धटपणे बोलणे, स्वभावात हिंसकपणा येणे, एखादी गोष्ट पाहिजे असल्यास त्यासाठी नको त्या पातळीवर जाऊन हट्ट करणे, मोबाइलला प्रतिबंध केल्यास तीव्र प्रतिक्रिया देणे. ही लक्षणे जर मुलांमध्ये जाणवली तर नक्की पालकांनी व शिक्षकांनी याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.
विशिष्ट पान टपर्यांवर आणि काही ठराविक ठिकाणी हे पदार्थ उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येकाला कोडवर्ड दिलेला असतो. जो कोड वर्ड ङ्गक्त घेणार्याला आणि विकणार्याला माहिती असतो. या सर्वांचे व्हॉट्सअॅप ग्रुपही अलीकडील काळात निर्माण झाले आहेत. दर महिन्याला हे कोडवर्ड बदलले जातात आणि त्याची माहिती ग्रुपवर पाठवली जाते. उदाहरणार्थ, बटन म्हणलं की ब्राउन शुगर मिळते. म्याऊ म्याऊ म्हटलं की मेफेड्रोन मिळते.
उपाय काय?
– शासन, शैक्षणिक संस्था, प्रसारमाध्यमे, शिक्षक, पालक, डॉक्टर, समुपदेशक, पोलीस यंत्रणा या सर्वांनी एकत्रित येऊन या विषयावर गंभीरपणे विचार करून काम करणे अत्यावश्यक आहे.
– हा राक्षस आता आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचला आहे. मुलांइतकेच किंवा काही प्रमाणात जास्त मुलींमध्येसुद्धा याचा शिरकाव झाला आहे.
– मुलांची सातत्याने स्नेहसंवाद ठेवणे. मुलांचे मित्र, छंद, त्यांचा दिनक्रम याची माहिती ठेवणे.
– मुलं ही पालक व शिक्षक यांना आदर्श मानतात. त्यामुळे मुलांमध्ये नकारात्मक संदेश जाईल असे वर्तन न करणे.
– यामध्ये कायद्यानुसार जी शिक्षा आहे, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्यात सुधारणा करणे.
– यामध्ये लाखो करोडो रुपयांचे व्यवहार होत असतात त्यामुळे त्याच्याशी लढण्यासाठी आपल्याला खूप ताकतीने काम करावे लागणार आहे.
काही शाळांमध्ये प्राथमिक वर्गातसुद्धा मुलांना या गोष्टीकडे आकर्षण करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे खाऊ चॉकलेट्स ही शाळांच्या बाहेर उपलब्ध आहेत. मुले ती खातात. त्याच्यात काही प्रमाणामध्ये अमली पदार्थ असतात आणि मग अगदी छोट्या वयातसुद्धा मुलांना व्यसन लागते.
नव्या प्रकारचे अमली पदार्थ
आपल्याकडे शालेय वयोगटातील मुले असोत किंवा नसोत, तरीही हा संदेश सर्व पालकांपर्यंत पोहोचवावा. सध्या शाळांमध्ये एक नवीन आणि धोकादायक अमली पदार्थ पसरत आहे. याला स्ट्रॉबेरी क्विक किंवा स्ट्रॉबेरी मेथ असे म्हणतात. हे क्रिस्टल मेथ नावाचे ड्रग असून, ते दिसायला आणि चवीलाही स्ट्रॉबेरी पॉप रॉक्स (तोंडात फुटणार्या गोड कँडीसारखे) यांसारखे असते.
हे ड्रग मुलांना कँडीच्या स्वरूपात शाळेच्या आवारात वाटले जात आहे. त्यामुळे अनेक निष्पाप मुले हे गोड पदार्थ समजून खात आहेत आणि त्यांना गंभीर स्वरूपाच्या समस्या उद्भवत आहेत. काही मुले तर तातडीने रुग्णालयात दाखल केली जात आहेत. हे केवळ स्ट्रॉबेरी चवीलाच नाही, तर चॉकलेट, पीनट बटर, कोला, चेरी, द्राक्ष आणि संत्री अशा विविध फ्लेवर्समध्येही आढळते.
म्हणूनच, पालकांनी आपल्या मुलांना समज द्यावी की कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून कँडी किंवा खाण्याचे पदार्थ स्वीकारू नयेत. तसेच, मित्राने दिले तरीही खात्री न करता ते ताबडतोब शिक्षक, मुख्याध्यापक किंवा इतर जबाबदार व्यक्तीकडे द्यावे.





