वाहतूक खर्च कमी करण्याचा प्रयत्न – व्ही. के. सिंह

महागाई रोखण्यास होणार मदत
नवी दिल्ली – भारतातील वाहतूक विस्कळीत पद्धतीने चालते. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून वस्तूंचा व सेवांचा खर्च वाढतो. त्यामुळे गरज नसताना महागाई वाढते. ही महागाई कमी करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याबाबत सरकार प्रयत्न करणार आहे, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी असोचेम या उद्योजकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना सांगितले.
ते म्हणाले की, भारतातील रस्ते जागतिक दर्जाचे व्हावे यासाठी गेल्या सहा वर्षांपासून केलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. यामुळे केवळ वाहतुकीचा वेग वाढत नाही तर अपघाताचे प्रमाण कमी होत आहे. गेल्या दोन वर्षापासून रस्त्यावरील टोल देण्याची यंत्रणा आधुनिक करण्यात येत आहे. यासाठी फास्टॅगचा वापर केला जाऊ लागला आहे.
आता फास्टॅग लोकप्रिय झाले आहे. त्यामुळे वाहनांना टोल देण्यासाठी रस्त्यावर थांबण्याची गरज नाही. यामुळे वाहतुकीचा वेग तर वाढतोच त्याचबरोबर इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होते. एकीकडे रस्ते सुरक्षित आणि वेगवान वाहतुकीसाठी योग्यरित्या विकसित केले जात असतानाच भारतातील वाहनांची सुरक्षा वाढविण्याबाबात प्रयत्न करण्यात येत आहे.
भारतातील वाहनांचे इंधन सध्या जागतिक दर्जाचे आहे. यामुळे उत्सर्जन कमी होते. भारतात रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरुण अधिक वेगाने वाहन चालवत असल्यामुळे यातील सर्वाधिक अपघात होत असतात. या संदर्भातील नियम कडक करून अपघाताचे प्रमाण कमी करण्यात येणार आहे.
बंदरे महामार्गाशी जोडणार
देशातील सर्व मोठी बंदरे महामार्गाशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे बंदरातून आलेला माल वेगात महामार्गावर जाऊ शकेल. त्यामुळे इंधन, वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर देशातील जलमार्ग वाहतुकीसाठी तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितले.





