जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; आरोग्य मंत्र्यांच्या परिषदेतील दावा

केवडिया (गुजरात) – भारतात कोविडमुळे 47 लाख रूग्णांहून अधिक रूग्ण मरण पावल्याचा जो दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे तो भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेच्या 14 व्या परिषदेला उपस्थित राहिलेल्या विविध राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने करण्यात आलेला हा दावा निराधार असल्याचेही भारताकडून या आधीच सांगण्यात आले आहे.
कोविड मृत्यूची नोंद करण्यासाठी भारतात एक मजबूत, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक प्रणाली आहे आणि सर्व कोविड मृत्यूची कायदेशीर प्रक्रियेनंतर पद्धतशीरपणे पारदर्शकपणे नोंद केली जाते. त्यामुळे भारताकडून जो अधिकृत कोविड मृतांचा आकडा जाहींर करण्यात आला आहे तो चुकीचा नाही असेही मत या परिषदेत व्यक्त करण्यात आले आहे.
या परिषदेत भारतातील कोविड मृत्यूच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजांवर जोरदार आक्षेप घेत एक ठराव मंजूर करण्यात आला. त्यात असे म्हटले आहे की डब्ल्यूएचओचा अंदाज भारताला पुर्ण अमान्य आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने ज्या पद्धतीने ही आकडेवारी काढली आहे ती पद्धतच दोषपुर्ण आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.कर्नाटकचे आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी मृत्यूच्या अंदाजापर्यंत पोहोचण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे वापरल्या जाणाऱ्या मॉडेलिंग पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आरोप केला की हा भारताची प्रतिष्ठा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे.





