बारामतीत पिस्तुलाचा धाक दाखवत पेट्रोलपंप व्यवस्थापकाला लुटण्याचा प्रयत्न; आठवड्यातील ही तिसरी घटना

बारामती (प्रतिनिधी) – बारामतीतील पाटस रस्त्यावरील कृष्ण पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकाला सोमवारी (दि. ७) भर दुपारी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. पेट्रोल पंपावरील रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असताना पिस्तुलाचा धाक दाखवत हा प्रकार घडला. या घटनेत पंपाचे व्यवस्थापक मयुर शिंदे (वय ३२) हे गंभीर जखमी झाले.
परंतु त्यांनी बचावाचा प्रतिकार केल्याने दोघा चोरट्यांना ही रोकड न घेताच तेथून पसार व्हावे लागले. प्रतिकार करताना शिंदे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेजारील काही मुलांनी घटनास्थळी धाव घेतल्याने त्यांचे प्राण वाचले.
सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता नेहमीप्रमाणे शिंदे यांनी पेट्रोलपंपावरील रक्कम घेतली. ती भरण्यासाठी ते दुचाकीवरून शहराच्या दिशेने येत होते. यावेळी स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला.
त्यांच्याकडील रक्कम असणारी बॅग हिसका मारून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु शिंदे चोरट्यांशी दोन हात करत बॅग पोटाखाली दाबून ठेवली. बारामती शहरात गुन्हेगारी वाढत असून आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे





