Crime News : खोट्या तक्रारींची धमकी देत 70 लाखांच्या खंडणीचा प्रयत्न; शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News : या सर्व कारवाया थांबविण्याच्या बदल्यात आरोपीने ७० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शिरूर : माहितीच्या अधिकाराचा (RTI) गैरवापर, खोट्या तक्रारी, ई-मेलद्वारे बदनामी आणि व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून संस्थेची प्रतिमा मलिन करण्याची धमकी देत तब्बल ७० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४०/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम ३०८(३) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी शरद वसंतराव फराटे (वय ४८, व्यवसाय – दूध डेअरी व शिक्षण संस्था, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. तर संतोष यशवंत आडसूळ (रा. बोरी पारधी, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २० जुलै २०२५ तसेच १६ जून २०२६ रोजी मौजे बोरी पारधी आणि मांडवगण फराटा येथील श्री वसंतराव फराटे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच विविध माध्यमांतून संस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने महाविद्यालय आणि त्यांच्याशी संबंधित शैक्षणिक संस्थांविरोधात विद्यापीठ स्तरावर तसेच विविध कार्यालयांकडे खोट्या तक्रारी करणे, ई-मेलद्वारे बदनामीकारक माहिती पाठविणे, माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून वैयक्तिक माहिती मागविणे आणि व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून संस्थेची प्रतिमा मलिन करण्याची भीती दाखवून संस्थेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या सर्व कारवाया थांबविण्याच्या बदल्यात आरोपीने ७० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अखेर या प्रकाराला कंटाळून फिर्यादीने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांना धमकावून आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहे .





