पुणे | पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर कार नेण्याचा प्रयत्न

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रात्र गस्त पथकातील पोलीस अधिकाऱ्यावर कार नेत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात पोलीस अधिकाऱ्यास स्वसरंक्षणार्थ कारच्या दिशेने एक गोळी झाडावी लागली. ही थरारक घटना कात्रज परिसरात रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास वंडर सिटीजवळ घडली.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक रतिकांत चंद्रशा कोळी (३०, रा. स्वारगेट) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार डीझेल चोरणाऱ्या सशस्त्र टोळीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रतिकांत कोळी हे रविवारी मध्यरात्री कात्रज परिसरात गस्तीवर होते.
त्यांना वंडरसिटीजवळ स्विफ्ट कारसह चार संशयित व्यक्ती दिसले. पोलीस ते कारजवळ जाऊ लागतात. सशस्त्र असलेल्या चारही व्यक्ती कारमध्ये बसल्या. त्यांना थांबण्याचा इशारा केला, मात्र कार रिव्हर्स घेऊन ते पळण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांनी जवळपास शंभर मीटर कार मागे पळवली. कारला थांबवण्यासाठी पोलीस पळू लागले. यावर चालकाने कार अचानक कोळी यांच्या दिशेने आणली.
गाडी अंगावर येत असल्याचे दिसता, कोळी यांनी पुन्हा थांबण्याचा इशारा केला. मात्र, कार थांबत नसल्याने त्यांनी पिस्तूलमधून कारच्या मागच्या चाकावर गोळी झाडली. यावर कारचालक नवले पुलाकडे पळाला. यानंतर पोलिसांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण, कार सापडली नाही. पोलीस पुन्हा घटनास्थळी आले, तेव्हा त्यांना एका ट्रकच्या टाकीचे नट काढून त्यातून पाइपद्वारे डीझेल चोरले जात असल्याचे आढळले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत.
पोलीसच सुरक्षित नाहीत!
काही दिवसांपूर्वी खडकी परिसरात गस्तीवरील दोन पोलिसांना कारने उडवले होते. यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला. तर, विश्रामबाग हद्दीत महिला वाहतूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला. यामुळे पुण्यात पोलीसच सुरक्षित राहिले नसल्याचे चित्र आहे.





