प्रयत्न ठरले अपयशी! गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर आढळलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे समुद्र किनारी व्हेल माशाचे पिल्लू आढळले होते. तब्बल 40 तासांच्या प्रयत्नानंतर त्याला खोल समुद्रात सोडण्यात आले होते. त्यानंतर सर्वांनी आनंद व्यक्त केला. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. या व्हेल माशाचा अखेर मृत्यू झाला आहे.
हे व्हेल माशाचे पिल्लू 13 नोव्हेंबर रोजी सकाळी पहिल्यांदा निदर्शनास आला होता. गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ ग्रामस्थांना व्हेल माशाचं पिल्लू बेशुद्ध अवस्थेत सापडलं होतं. या पिल्लाची प्रकृती खालावलेली होती. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाकडून या व्हेल माशाला जिवंत ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. व्हेल माशाच्या पिल्लाला दोन दिवसांत जवळपास पाच वेळा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र दूर समुद्रात सोडलेला बेबी व्हेल 15 नोव्हेंबरला संध्याकाळी पुन्हा एकदा व्हेल माशाचे पिल्लू किनाऱ्यावर आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
समुद्रातील ओहोटीमुळे हे पिल्लू समुद्र किनाऱ्यावरील वाळूत रुतून बसलं होतं. त्याला वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यशही मिळाले होते. अखेर जवळपास दोन दिवसांच्या मेहनतीनंतर या व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्र किनाऱ्यापासून अंदाजे चार ते पाच किमी आत सोडण्यात आले होते.
समुद्रातील ओहोटीमुळे हे व्हेल माशाचं पिल्लू समूद्राच्या किनाऱ्यावर अडकून पडलं होतं. व्हेल माशाच्या पिल्लाचं वजन सुमारे ४ ते सहा टनापर्यंत आणि लांबी २० फूट होती. समुद्राला ओहोटी असल्यामुळे या पिल्लाला समुद्रात सोडण्यात काही अडचणी येत होत्या. मात्र अथक प्रयत्नानंतरही या व्हेल माशाच्या पिल्लाचा मृत्यू झाला.





