लंडन : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्याचे पडसाद ब्रिटनच्या संसदेत पडले आहेत. संसदेतल्या काही सदस्यांनी पुन्हा बांगलादेशातल्या हिंदू धार्मिक नेत्यांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लेबर पार्टीचे खासदार बॅरी गार्डिनर यांनी सोमवारी या मुद्यावर तातडीने उत्तराची मागणी केली. त्यावर उत्तर देताना बांगलादेशच्या हंगामी सरकारने अल्पसंख्यांकाना मदत उपलब्ध करून दिल्याचे आपल्याला सांगितल्याची माहीती इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठीच्या परराष्ट्र कार्यालय मंत्री कॅथरीन वेस्ट यांनी सांगितले. चिन्मय कृष्ण दास यांची आणि अन्य हिंदू धार्मिक नेत्यांच्या अटकेची ब्रिटन सरकारला पूर्ण जाणीव आहे. दार्मिक स्वातंत्र्याचे महत्व आणि प्रामुख्याने हिंदूंवर परिणाम होणाऱ्या बांगलादेशातील घटनावर ब्रिटन सरकार नियमित लक्ष ठेवून असेल आणि बांगलादेशमधील हंगामी सरकारशी नियमित संवाद देखील केला जाईल, असेही वेस्ट यांनी सांगितले. हिंदू धार्मिक नेते चिन्मय दास यांना बांगलादेशात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यापासून तेथील तणाव वाढला आहे. ही स्थिती हिंदूंसाठी अत्यंत धोकादायक आहे, असे सांगून लंडनमधील ब्रेन्ट वेस्ट येथील खासदार गार्डिनर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्याशिवाय भारतीय वंशाच्या खासदार प्रिती पटेल यांनीही बांगलादेशातील घडामोडींबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्याच पक्षाचे सहकारी आणि ब्रिटीश हिंदूंसाठीच्या सर्वपक्षीय संसदीय गटाचे अध्यक्ष बॉब ब्लॅकमॅन यांनीही हिंदूंच्या घरांना आगी लावल्या जाणे, दुकानांची तोडफोड होण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अन्य काही हिंदू, शीख खासदारांनीही बांगलादेशातील हिंदू कुटुबीयांप्रती चिंता व्यक्त केली आहे.