शिवसैनिकावरील हल्ल्यामुळे वातावरण तापले; आमदार नितेश राणेंना अटक होणार?

मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे.
सचिन सातपुतेच्या चौकशी नंतर शिवसेनेने नितेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील नितेश राणेंच्या अटकेच्या मागणीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणेंना अटक करण्यासंबंधी होणाऱ्या मागणीवर बोलताना ते म्हणाले की, मला याविषयी माहिती नाही, ही कायदेशीर बाब आहे. मी बोलणे बरोबर नाही. तेथील दोन पालकमंत्री आहेत ते बोलतील. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कोणी काही गुन्हा केला तर कायद्याने कारवाई होते.
दरम्यान, नितेश राणेंनी काहीही केलेले नसून केवळ सुडाच्या भावनेतून हे आरोप करण्यात येत आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. काही संबंध नसताना येणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सत्तारुढ लोकांचा पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून हा प्रकार सुरु आहे.
गुन्हा दाखल केला आहे की नाही हे मला माहित नाही. पण हे सुडाच्या राजकारणातून चाललेले आहे. नितेश राणे अज्ञातवासात नाहीत. अज्ञातवासात जाण्याची आम्हाला गरज नाही. ते आमदार आहेत. अटक करणार अशा रितीने बातम्या दिल्या तर कोर्टात जावे लागेल, असे नारायण राणे म्हणाले.





