Attack on Sarpanch : रक्तरंजित राजकारण! हवेलीत भाजप उमेदवारावर टोळक्याचा हल्ला; १ लाखाची रोकडही लंपास
Attack on Sarpanch : उरुळी कांचन पोलिसांनी पाच जणांवर केला गुन्हा दाखल; सरपंच सुरज चौधरींच्या तक्रारीनंतर हवेलीच्या राजकारणात खळबळ.

Attack on Sarpanch – पूर्व हवेलीतील पेठ गावचे आदर्श सरपंच व भाजप उमेदवार सुरज भालचंद्र चौधरी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुरज चौधरी यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विजय रामचंद्र चौधरी, ओम विजय चौधरी, तानाजी विलास चौधरी, हर्षद राजेश चौधरी व विशाल दिपक चौधरी (सर्व रा. पेठ, ता. हवेली, जि. पुणे) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास सुरज चौधरी हे त्यांच्या कुटुंबीयांसह घरी असताना बाहेरून मोठमोठ्याने शिवीगाळ करत ‘सूरज कुठे आहे?’ असे ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर विजय रामचंद्र चौधरी व त्यांचा मुलगा ओम चौधरी हे घरात घुसले. विजय चौधरी यांच्या हातात चाकू तर ओम चौधरी यांच्या हातात लोखंडी रॉड होता.आरोपींनी सूरज चौधरी यांच्या वडिलांना हाताने मारहाण केली.
ही मारहाण थांबविण्यासाठी अक्षय चौधरी मध्ये गेले असता विजय चौधरी यांनी चाकूने त्यांच्या पोटावर वार करून गंभीर दुखापत केली. यावेळी आई शोभा चौधरी सोडविण्यासाठी पुढे गेल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांच्या केसांना ओढून कपडे फाडण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.दरम्यान, तानाजी चौधरी, हर्षद चौधरी व विशाल चौधरी हेही घरात घुसले. तानाजी चौधरी यांच्या हातात लोखंडी रॉड होता.
सर्व आरोपींनी मिळून सुरज चौधरी, त्यांचे वडील भालचंद्र चौधरी व भाऊ संदेश चौधरी यांना लाथा-बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर घरातील सामानाची तोडफोड करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.घटनेनंतर घराची पाहणी केली असता हॉलमधील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली सुमारे एक लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे आढळून आले. यानंतर सुरज चौधरी यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन वांगडे करीत आहेत.
राजकीय द्वेषातून हल्ला
सूरज चौधरी हे हवेली पंचायत समितीच्या कोरेगाव-मुळ गटातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडले असून, त्यानंतर दुसर्याच दिवशी त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला हा राजकीय द्वेषातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दृष्टीनेही पोलीस तपास सुरू आहे.





