“फक्त ११ मिनिटं झाला अत्याचार”; महिला न्यायाधीशांनीच कमी केली आरोपीची शिक्षा

नवी दिल्ली : बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी नेहमीच केली जाते. जगभरात ही मागणी केली जाते. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता एका स्थानिक न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयावरून स्वित्झर्लंडमध्ये वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे हा निर्णय एका महिला न्यायाधीशांनी दिला आहे. मोठ्या संख्येने महिला या न्यायालयासमोर आंदोलन करत असून आरोपीची शिक्षा वाढवण्याची मागणी केली जात आहे.
स्वित्झर्लंडमधील माध्यमांच्या हवाल्याने एका इंग्रजी वृत्तसंस्थेने यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ही घटना या वर्षी फेब्रुवारी महिन्यात घडली. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, बेसलमध्ये हा प्रकार घडला. पीडित महिला नाईट क्लबमधून आल्यानंतर तिच्या घराबाहेर दोन व्यक्तींनी तिच्यावर हल्ला केला आणि तिला बंदी केले. यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.
आरोपींमध्ये एकाचे वय ३२ वर्षे तर दुसऱ्या अल्पवयीन मुलाचे वय १७ वर्षे होते. या प्रकरणाची स्थानिक न्यायालयात सुनावणी सुरू असताना संबंधित महिला न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयावरून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
गेल्या महिन्यात स्वित्झर्लंडमधील एका न्यायालयात सुरू असलेल्या बलात्काराच्या प्रकरणाच्या सुनावणीवेळी हा निकाल देण्यात आला आहे. यामध्ये सहभागी असलेल्या आरोपीची शिक्षा ५१ महिन्यांवरून कमी करून ३६ महिने करण्यात आली. त्यासोबतच, “पीडित महिलेनंच काही विशिष्ट संकेत दिले असतील, म्हणून हा प्रसंग ओढवला”, अशी टिप्पणी देखील या महिला न्यायाधीशांनी केली.
नाईट क्लबमधील स्वच्छतागृहात जाताना पीडित महिलेने दोघा आरोपींना विशिष्ट सिग्नल दिला होता, असे देखील महिला न्यायाधीशांनी नमूद केले. त्यांच्या या टिप्पणीमुळे देशभरात संतप्त भावना व्यक्त होत असून महिला मोठ्या संख्येने आंदोलनात उतरल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणातील दुसऱ्या अल्पवयीन आरोपीला अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.
या निकालानंतर पीडितेला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया तिच्या वकिलांनी दिली आहे. तसेच, हा निकाल मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी संबंधित न्यायालयासमोर मोठ्या प्रमाणावर निषेध केला जात असून यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे.





