Nisarga Wari 2026 : अटलांटात निसर्गवारीचा भक्तिमय सोहळा; सहाव्या वर्षी 175 भाविकांचा सहभाग
Nisarga Wari 2026 : अटलांटामध्ये निसर्ग वारी २०२६चे सहावे वर्ष उत्साहात साजरे झाले. १७५ भाविक सहभागी झाले; अभंग, भक्तिसंगीत, दिंडी आणि रिंगणाने वारीची सांगता झाली.

अटलांटा | प्राजक्ता पाडगांवकर
Nisarga Wari 2026 : आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमेरिकेतील अटलांटा येथे आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग वारी २०२६ची सांगता भक्ती, संगीत, संत साहित्य आणि पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाने झाली. निसर्गवारीच्या सहाव्या वर्षात अटलांटा समूहासोबत जवळपास १०० वारकरी सहभागी झाले. या सर्वांनी मिळून सुमारे ३ हजार मैलांचे अंतर चालत पूर्ण केले. सांगता कार्यक्रमाला अटलांटामध्ये जवळपास १७५ भाविकांची उपस्थिती होती.
कोरोना काळात महाराष्ट्रातील पारंपरिक वारी लाक्षणिक स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. त्याच काळापासून भारताबाहेर ‘निसर्गवारी’ ही संकल्पना सुरू झाली. देहू ते पंढरपूर हे साधारण १५० मैलांचे अंतर मनात पूर्ण करण्याचा संकल्प करत जगभरातील निसर्गवारकरी या उपक्रमात सहभागी होतात.
निसर्गवारी ही महिनाभर चालणारी वैयक्तिक वारी आहे. सहभागी वारकरी आपल्या घराजवळ, पाच मैल किंवा शक्य असेल तेवढे अंतर दररोज चालतात. या काळात ई-मेल आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून निरूपण, अभंग आणि भक्तिसाहित्य ऐकण्याची व्यवस्था केली जाते. चालताना अभंगांचा अनुभव घेता यावा यासाठी यूट्यूब आणि स्पॉटिफायवर विशेष प्लेलिस्टही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या वारीमध्ये निसर्गालाच पांडुरंगाचे रूप मानण्याची भावना आहे. सुंदर सूर्योदय, वाटेत दिसणारे पक्षी-प्राणी, प्रसन्न फुले किंवा हिरवीगार झाडे अशा विविध रूपांत वारकऱ्यांना निसर्गात पांडुरंगाची अनुभूती येते. या अनुभवांचे फोटो आणि आठवणी वारकरी नियमितपणे व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर करतात.
मराठी वारसा जपणाऱ्या बालकलाकारांची मैफल
आषाढी एकादशीच्या दिवशी निसर्गवारीची सांगता एका विशेष कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाची सुरुवात अमेरिकेत लहानाची मोठी झालेल्या मराठी मुलांच्या संगीत मैफिलीने झाली. जवळपास १५ मुलांनी अभंग आणि भक्तिसंगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सुस्पष्ट मराठी उच्चार, अभंगांचा अर्थ समजून घेत केलेले सादरीकरण आणि त्यातील तल्लीनता यामुळे या मैफिलीला विशेष दाद मिळाली.
या मुलांना मराठी भाषा, संत साहित्य आणि संगीताची ओळख करून देण्यात त्यांच्या पालकांसह संगीत शिक्षिका मधुरा खरे आणि स्वप्ना कुमठेकर यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. परदेशात राहूनही पुढील पिढीपर्यंत मराठी सांस्कृतिक वारसा पोहोचवण्याचे काम या माध्यमातून होत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
यानंतर मनोबळ फाउंडेशनचे यजुवेंद्र महाजन यांनी कर्मयोगाच्या महतीवर छोटेखानी व्याख्यान दिले. त्यानंतर अंजली कुलकर्णी यांनी संत ज्ञानदेवांची संजीवन समाधी आणि तिचा क्वांटम फिजिक्सशी साधता येणारा संबंध यावर आपले विचार मांडले.
प्राजक्ता पाडगांवकर यांनी स्त्री संत साहित्य आणि आजच्या काळातील स्त्रियांच्या समस्या यांचा संबंध जोडत निवडक स्त्री संतांच्या अभंगांचे निरूपण सादर केले. कार्यक्रमाच्या पुढील भागात डॉ. संगीता तोडमल आणि निलेश इंगुलकर यांनी भारूड आणि गवळण सादर केली. अखेरीस पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
विठ्ठलनामाच्या गजरात रिंगण
कार्यक्रमानंतर निसर्गवारकऱ्यांनी छोटी दिंडी काढली. विठ्ठलनामाचा गजर करत रिंगण करण्यात आले आणि अशा भक्तिमय वातावरणात निसर्गवारीची सांगता झाली. पुढील वर्षीच्या वारीची आस मनात ठेवत वारकऱ्यांनी एकमेकांना छोटी रोपटी देऊन निरोप घेतला. भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम निसर्गवारीच्या संकल्पनेला साजेसा ठरला.
अटलांटासोबतच अमेरिकेतील कॅन्सस सिटी आणि इतर भागांतही निसर्गवारीत नागरिक सहभागी झाले. अमेरिकेबाहेर सिंगापूर, भारत आणि फिनलंड येथूनही निसर्गवारकऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यामुळे निसर्गवारीने देशाच्या सीमा ओलांडत भक्ती, निसर्गप्रेम आणि मराठी सांस्कृतिक वारसा यांना जोडणारा उपक्रम म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.





