अटल सेतू सहा महिन्यांत खचला ! अनेक ठिकाणी पडल्या भेगा; कामाच्या दर्जावरुन नाना पटोलेंची टीका

मुंबई – मुंबईतील शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू प्रवाशांच्या जानेवारी महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. मात्र, अवघ्या सहा महिन्यातच या पुलाची दुरवस्था झाली आहे. अटल सेतू पुलावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. अटल सेतू पुलावरावरची माती खचायला लागली आहे.
यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टला रोडला गळती लागल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर आता महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अटल सेतू पुलाची सहा महिन्यांत माती खचायला लागली आहे. पुलाला तडे जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला आहे. नाना पटोलेंनी अटल सेतू पुलाला तडे गेल्याची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
नाना पटोले म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाचा भाग म्हणून सरकारचा भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत या पुलाची पाहणी केली. सदर बाब अत्यंत गंभीर असून आदरणीय उच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल घेऊन चौकशी करावी.
याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार आहे. तसेच बिहारमध्ये नवनिर्मित पुल कोसळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सरकारच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
दरम्यान, 22 कि.मी लांबीचा देशातील सर्वात लांब सागरी सेतू असलेल्या अटल सेतूचे जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले होते. या सागरी सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई अंतर अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करता येते. एमएमआरडीमार्फत बांधण्यात आलेल्या अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.





