Atal Setu: अटल सेतू 14 तासांसाठी राहणार बंद, काय आहे नेमकं कारण?

Atal Setu: जर तुम्ही अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी अटल सेतूवरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अटल सेतू महामार्ग तब्बल १४ तासांसाठी बंद राहणार आहे. द टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीए यांच्या सहयोगाने रविवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ‘लार्सन आणि टुब्रो सी-ब्रिज मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. १७ आणि १८ फेब्रुवारीला अटल सेतू ठराविक काळासाठी बंद असणार आहे.
कोणत्या वेळात ‘अटल सेतू’वर प्रवास करता येणार नाही ?
मुंबईतील या वर्षीची मॅरेथॉन ही पहिल्यांदाच नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या अटल सेतूवर आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे अटल सेतूवरून शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण १४ तासांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. अटल सेतू शिवडी-न्हावा शेवा सी लिंकवर १८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ ते दुपारी १२ या कालावधीत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
इतर वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापूर- वाशी मुंबई अशी वळवण्यात येणार आहे. तसेच जुना मुंबई-पुणे हायवे व कोकणातून येणाऱ्या वाहनांना तसेच पनवेलकडून येणाऱ्या वाहनांना देखील गव्हाण फाटा, उरण फाटा, वाशीमार्गे पुढे इच्छित मार्गावर जाता येणार आहे.
तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही गव्हाण फाटामार्गे वाशी या मार्गाने वळविण्यात आली आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करू, अशा इशाराही पोलिसांनी दिला आहे. यामध्ये अत्यावश्यक वाहनांना सूट देण्यात आली आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.





