मंचर, (प्रतिनिधी) – गाव पातळीवर पतसंस्था अर्थवाहिनी झाल्या असून गरीब आणि गरजूंना तातडीने कर्ज पुरवठा केला जातो, पतसंस्थांच्या विश्वस्तांनी प्रामाणिकपणे पतसंस्थेची आर्थिक उन्नती करावी आणि सभासदांना न्याय द्यावा, असे आवाहन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. घोडेगाव येथील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष सखाराम घोडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वार्षिक सभेस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, विष्णू (काका) हिंगे, सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, माजी संचालक लेखा व कोषागरे वित्त विभाग शिलानाथ जाधव, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक किशोर जाधव, संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष सखाराम घोडेकर, हभप पांडुरंग महाराज येवले, माजी सभापती कैलास काळे, विष्णू लडकत, भीमाशंकर साखर कारखान्याचे तज्ञ संचालक गणेश कोकणे, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष गणेश भास्कर, संत सावता महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भास्कर, सरपंच अश्विनी तिटकारे, सोमनाथ काळे पाटील, सुदाम काळे पाटील, रुपाली झोडगे, रत्ना गाडे, गौतम खरात, युगप्रवर्तक पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताशेठ कोकणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण घोडेकर, प्रस्तावना संस्थेचे संचालक सूर्यकांत गांधी, अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन काळे आणि कायदेशीर सल्लागार अॅड. चेतन उदावंत यांनी आभार मानले. चालू आर्थिक वर्षाअखेर संस्थेकडे 18 कोटी 2 लाख रुपये ठेवी, कर्जरुपाने 15 कोटी 97 लाख रुपयांचे सभासद कर्ज वाटप केले असून, नफा 36 लाख 931 रुपये एवढा झालेला आहे. संस्थेचे खेळते भांडवल 23 कोटी 9 लाख रुपये आहे. संस्थेमार्फत 12 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. लाभांशा व्यतिरिक्त सभासदांचा 1 लाख रुपये विमा काढण्यात आला.-सखाराम घोडेकर, संस्थापक अध्यक्ष