पिंपरी – वाकड परिसरातील सोसायट्यांमध्ये पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशनच्या वतीने आणि पंजाब नॅशनल बॅंकेच्या सहकार्याने सध्या “एटीएम आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला आहे.
वाकड परिसरातील सोसायट्यांमध्ये शनिवारी (दि. 4) या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. उपक्रमामध्ये वाकड परिसरातील 35 सोसायट्यांमध्ये नागरिकांना सोसायटीच्या आवारातच एटीएमची सुविधा दिली जात आहे. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी 225 जणांनी त्याचा फायदा घेतला. हा उपक्रम राबवताना सोशल डिस्टन्सिंगकडे पुरेपूर लक्ष दिले जात आहे. सुरुवातीला हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वांवर तीन दिवसांसाठी घेण्यात आला आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादावर पुढे हा उपक्रम असाच सुरू ठेवण्याचे नियोजन आहे.
वाकड येथील हॉरिझन सोसायटीतील सदस्यांनी या उपक्रमाचा आज लाभ घेतला. उपक्रमांतर्गत प्रति व्यक्ती जास्तीत जास्त दहा हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी “एटीएम आपल्या दारी’ या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळेच आम्ही वाकड परिसरातील 35 सोसायट्यांमध्ये हा उपक्रम सध्या प्रायोगिक तत्त्वावर राबवित आहोत. अन्य तीन-चार बॅंकांच्या अधिकाऱ्यांसमवेत देखील याबाबत आमची चर्चा सुरू आहे.
– के. सी. गर्ग, सरचिटणीस
आमच्या सोसायटीमध्ये आज पंजाब नॅशनल बॅंकेच्या वतीने सोसायटीच्या आवारातच एटीएमची सुविधा पुरविण्यात आली. सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या सुविधेमुळे सोसायटीतील रहिवाशांची घराजवळच चांगली सोय झाली.
– सिद्धेश खेडेकर, अध्यक्ष, हॉरिझन सोसायटी.