चीनमधील पूल कोसळल्याने ११ ठार

बीजंग – चीनमधील एक पूल कोसळल्यामुळे किमान ११ जण ठार आणि ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. चीनमधील शांक्सी प्रांतात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे महामार्गावरील हा पूल कोसळला असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अतिवृष्टी आणि पुरामुळे शांगूओ शहरातल्या झान्शूइ कौंटीमधील हा पूल शुक्रवारी संध्याकाळी अचानक कोसळला, असे शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे. हा पूल कोसळल्यामुळे पुलावरील कोही वाहने खालील जिन्कियान नदीमध्यये कोसळली. एकूण किती वाहने नदीमध्ये पडली, हे अजून निष्पन्न होणे बाकी आहे. बचाव पथकांनी यापैकी ५ वाहने पाण्यातून बाहेर काढली आहेत आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
मदतकार्यावर देखरेख करणारे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे, असे आपत्कालिन व्यवस्थापन मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच मदतकार्यासाठी ७३६ कर्मचारी, ७६ वाहने, १८ बोटी आणि ३२ ड्रोन देखील चीनच्या आपत्कालिन अग्निशामक आणि मदत पथकाने घटनास्थळी रवाना केली आहेत. चीनचे अधयक्ष शी जिनपिंग यांनी या दुर्घटनेनंतर लोकांच्या जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी सर्वसमावेशक मदत आणि बचावकार्याचे आदेश दिले आहेत.





