अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने सीएम फंडाला 82 हजार रुपयांची मदत

विश्रांतवाडी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने करोना निर्मुलनासाठी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पवार, व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्हा समन्वयक आणि महामंडळाचे कर्मचारी यांच्या वतीने एकूण ८२ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आली.
सर्व जिल्हा समन्वयक आणि मुख्य कार्यालयातील कर्मचारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ८२ हजार रुपये जमा करण्यात आले.
महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू केलेल्या लाभार्थ्यांनी देखील आपापल्या परीने मदत केली आहे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अधिकारी कर्मचारी व संचालक यांनी देखील मदत केली असल्याचे महामंडळाचे संचालक धनंजय जाधव यांनी सांगितले.





