Assembly Election Results 2023 : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा चार राज्यांमध्ये मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसमध्ये थेट निवडणूक आहे. तर, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीआधीची या निकालाकडे राजकीय सेमी-फायनल म्हणून पाहायले जात आहे.
निकालासाठी सज्ज झालेल्या चारपैकी राजस्थान आणि छत्तिसगढ या दोन राज्यांत कॉंग्रेसची सत्ता आहे. तर, भाजप (मध्यप्रदेश) आणि भारत राष्ट्र समिती (तेलंगणा) प्रत्येकी एका राज्यात सत्तेवर आहेत. साहजिकच, तिन्ही पक्षांच्या दृष्टीने निकाल अतिशय कळीचे ठरणार आहेत. प्रत्यक्ष निकालांआधी विविध मतदानोत्तर चाचण्यांनी त्यांचे अंदाज जाहीर केले. त्यामध्ये बरीच तफावत आहे. त्यामुळे मतदानोत्तर चाचण्यांचाही कस लागणार आहे. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर दुपारच्या सुमारास चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होऊ शकेल.
मध्यप्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. विधानसभेसाठी १९९ जागांसाठी मतदान पार पडले होते. राजस्थानात दर पाच वर्षांनी कॉंग्रेस आणि भाजपला आलटून-पालटून सत्ता मिळते. मागील ३० वर्षांपासूनची ती प्रथा कायम राहणार की बदलणार याचे उत्तर निकालातून मिळेल. कॉँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती.
तर छत्तिसगढमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. त्या राज्यात कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातच थेट लढत अपेक्षित आहे. तेलंगणात सत्तारूढ भारत राष्ट्र समितीला कॉंग्रेस कडवी लढत देणार असल्याचे निवडणूक काळात समोर आले. त्या राज्यात भाजप कुठला चमत्कार करणार का? याविषयी कुतूहल आहे. तसेच तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्त्वातील भारत राष्ट्र समिती( सरकार सत्ता टिकवणार की काँग्रेस बाजी मारणार हे काही तासात स्पष्ट होणार आहे.
मिझोराम निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली
मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलण्यात आली आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालाच्या दिवशी मिझोरामची मतमोजणी होणार नाही. त्यामुळे देशभरातील जनतेला मिझोरामचा निकाल एक दिवस उशिराने म्हणजेच 4 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.