Assam Elections 2026 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assam Elections 2026) पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी आसाममधील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा नवा उत्साह भरला. दिब्रुगड येथे आयोजित पन्ना प्रमुख संमेलनात बोलताना त्यांनी प्रत्येक बूथवर किमान ५० टक्के मते मिळवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य कार्यकर्त्यांसमोर ठेवले आहे. नितीन नबीन यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर व्होट बँकेच्या राजकारणाचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, काँग्रेसने आसामचा वापर केवळ सत्तेसाठी केला, त्यांच्याकडे राज्याच्या विकासासाठी कोणतेही धोरण किंवा क्षमता नव्हती. आज भाजप सरकार बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याचे काम करत असल्याने विरोधक अस्वस्थ झाले असल्याचे ते म्हणाले. Nitin Nabin घुसखोरांना पाठिंबा देणाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले आणि आसामी लोकांचे हक्क सुरक्षित ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे कौतुक केले. काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीचा उल्लेख करत नबीन यांनी मोदी सरकारची पाठराखण केली. एकेकाळी काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकत असत, पण मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ती परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आसाममधील घुसखोरीविरोधी मोहिमेचे पडसाद आता पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही उमटत आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. निवडणूक पन्ना प्रमुख रणनीती भाजपने आसाममध्ये आपल्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. पन्ना प्रमुख (मतदार यादीच्या प्रत्येक पानाचा प्रमुख) ही भाजपची यशस्वी रणनीती मानली जाते. नबीन यांनी या प्रमुखांना प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधून सरकारी योजनांचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. आगामी काळात आसाममध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत.