”INDIA’ हे ब्रिटीशांनी भारताचे ठेवलेले नाव आहे’, आसाम मुख्यमंत्र्यांच्या टीकेला काॅंग्रेसने दिले उत्तर, ‘मग मोदींनी….’

नवी दिल्ली- देशातील विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव इंडिया असे ठेवण्यात आले आहे त्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी इंडिया हे ब्रिटीशांनी भारताचे ठेवलेले नाव आहे अशी टीका केली होती. त्याला कॉंग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. असे जर आहे तर मोदींनी देशातील कार्यक्रमांना ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ अशी नावे का ठेवली असा सवाल कॉंग्रेसने त्यांना विचारला आहे.
सरमा यांना प्रत्युत्तर देताना कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडात आंबट द्राक्षे जास्त झाली असावीत. त्यांचे नवे गुरू श्रीमान मोदी यांनी आम्हाला स्किल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया आणि डिजिटल इंडिया अशा नावांच्या योंजना दिल्या आहेत, त्याचा त्यांना विसर पडला असावा.
तसेच मोदींनी वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘टीम इंडिया’ म्हणून एकत्र काम करण्यास सांगितले आहे याचाहीं दाखला रमेश यांनी दिला आहे. त्यांनी या सर्व बाबी आपल्या बॉसलाही समजावून सांगाव्यात असेही त्यांनी म्हटले आहे. रमेश यांनी मोदींचा एक जुना व्हिडिओही शेअर केला ज्यामध्ये ते मतदारांना “इंडियाला मतदान करा” असे आवाहन करताना दिसत आहेत.
एका ट्विटमध्ये सरमा म्हणाले होते, “आमचा संघर्ष भारत आणि इंडिया भोवती आहे. ब्रिटीशांनी आपल्या देशाचे नाव इंडिया असे ठेवले आहे. आपण ब्रिटीशकालीन वसाहतवादी मानसिकतेतून स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यावर जयराम रमेश यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.





