Asian Athletics Championships 2023 : श्रीशंकरला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट; चौथ्या दिवशी भारताला 5 पदके

थायलंड :- येथे सुरू असलेल्या 25 व्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताचा लांब उडीपटू श्रीशंकरने 8.37 मीटर उडी मारताना रौप्यपदकासह आगामी पॅरिस ऑलिंम्पिकसाठीची पात्रता देखील मिळवली.
शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी 5 पदके जिंकली. ज्यामध्ये 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे.
भारतीय मिश्र संघाने 400 मीटर रिलेमध्ये 3.14.70 सेकंद वेळेसह पहिले स्थान पटकावले. या संघात पुरुषांमध्ये राजेश रमेश, अमोज जेकब आणि महिलांमध्ये ऐश्वर्या मिश्रा आणि शुभा व्यंकटेशन यांचा समावेश होता. श्रीलंकेच्या संघाने 3.15.41 सेकंद वेळेसह दुसरे तर जपानच्या संघाने 3.15.71 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.
भारतीय खेळाडूंनी चौथ्या दिवशी 3 रौप्य पदके जिंकली. महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये स्वप्ना बर्मनने 5840 गुणांसह रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत उझबेकिस्तानच्या एकातेरिना वोरोनिनाने 6098 गुणांसह सुवर्ण आणि जपानच्या युकी यामासाकीने 5696 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
यासह, पुरुषांच्या उंच उडीत सर्वेश कुमारने 2.26 मीटरसह दुसरे स्थान पटकावले. तर संतोष कुमारने पुरुषांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकले.
भारताकडे 6 सुवर्णांसह 14 पदके…
भारत या स्पर्धेत आत्तापर्यंत 6 सुवर्ण व एकूण 14 पदकांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या दिवशी 400 मीटर मिश्र संघाने सुवर्णपदक पटकावले. याशिवाय तजिंदरपाल सिंग तूर, पारुल चौधरी, ज्योती याराजी, अजय कुमार सरोज आणि अब्दुल्ला अबुबकर यांनी भारतासाठी 1500 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.


