#AsiaCup2023 : श्रीलंकेचा बांगलादेशवर 5 विकेट्सने विजय

Bangladesh vs Sri Lanka Asia Cup 2023 | पाकिस्ताननंतर आता श्रीलंकेने आशिया कप 2023 मध्ये विजयी सलामी दिली आहे. गतविजेत्या श्रीलंकेने आपल्या आशिया चषकातील मोहिमेला विजयाने सुरुवात केली आहे. ब गटातील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पाच विकेट्सनी पराभव केला आहे.
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 42.4 षटकांत सर्वबाद 164 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 39 षटकांत पाच बाद 165 धावा करत लक्ष्य गाठले.
श्रीलंकेकडून सदिरा समरविक्रमा याने वनडे कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने 77 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. तर चरित अस्लंकाने वनडे कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. अस्लंकाने 92 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 62 धावा करत संघास विजय मिळवून दिला. सदीरा समरविक्रमा आणि चरिथ असलंका यांनी चौथ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. कर्णधार दासुन शनाका 14 धावा करून नाबाद राहिला. याव्यतिरिक्त पथुम निसांका 14 , दिमुथ करुणारत्ने 1 आणि कुसल मेंडिस पाच धावा करून बाद झाले.
बांगलादेशकडून कर्णधार शकिबने दोन बळी घेतले. त्याचवेळी तस्किन, शरीफुल आणि मेहदी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशी संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 42.4 षटकात 164 धावांवर आटोपला. बांगलादेशाकडून फलंदाजीत नजमुल हुसेन शांतोने अर्ध्याहून अधिक धावा केल्या. नजमुलने 122 चेंडूत 89 धावांची खेळी खेळली. त्याचे शतक अवघ्या 11 धावांनी हुकले. नजमुलशिवाय एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही.
तौहीद हृदयाने 20, मोहम्मद नईमने 16 आणि मुशफिकर रहीमने 13 धावा केल्या. या चौघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने चार बळी घेतले. महिष तिक्षाने दोन गडी बाद केले. धनंज डी सिल्वा, दुनिथ वेलालगे आणि दासुन शानाका यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.





