#AsiaCup2023 : रोहित शर्माने केलं राहुलचे कौतुक; म्हणाला,”इतक्या मोठ्या दुखापती व शस्त्रक्रियेनंतर..”

कोलंबो :- सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघात पुनरागमन करताना दमदार शतकी खेळी केली. तब्बल चार महिन्यांनंतर संघात परतलेल्या राहुलने कुठेही दडपण घेतले नाही व अफलातून खेळी केली ती अभिनंदनीयही आहे, अशा शब्दात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने राहुलचे कौतुक केले आहे.
इतक्या मोठ्या दुखापती व शस्त्रक्रियेनंतर चार महिन्यांच्या खंडानंतर संघात परतणे व शतक लगावणे सोपी गोष्ट नाही. राहुलने ती करुन दाखवली व आगामी विश्वकरंडक स्पर्धेसाठी तो सज्ज असल्याचेही सिद्ध केले. आता त्याच्यावर आम्ही चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पूर्णपणे भिस्त ठेवू शकतो, असेही रोहित म्हणाला.
दरम्यान, बीसीसीआयच्या निवड समितीने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर केला आहे. संघात अपेक्षेप्रमाणे लोकेश राहूलला स्थान देण्यात आले असून संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे.





