Team India : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूला दिला डच्चू

मुंबई: आशिया कप 2025 साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे केली आहे. इंग्लंड दौऱ्यावरील टेस्ट मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला यंदाच्या आशिया कप संघात स्थान मिळालेले नाही.
यंदाचा आशिया कप टी-20 स्वरूपात खेळला जाणार असून, यात 8 संघ सहभागी होतील. स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होईल, तर 28 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. दुबई आणि अबु धाबी येथे एकूण 19 सामने खेळवले जातील. यामध्ये 14 सप्टेंबरला होणारा बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना दुबईत होईल.
🚨 A look at #TeamIndia‘s squad for #AsiaCup 2025 🔽 pic.twitter.com/3VppXYQ5SO
— BCCI (@BCCI) August 19, 2025
भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध दुबईतच होईल, तर गटातील शेवटचा सामना 19 सप्टेंबरला अबु धाबीत खेळला जाईल. जर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले, तर दोन्ही संघांमध्ये 3 सामने होऊ शकतात. पुढील वर्षी भारतात टी-20 विश्वचषक होणार असल्याने या आशिया कपकडे विश्वचषकाची तयारी म्हणून पाहिले जात आहे.
आशिया कप 2025 साठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षीत राणा, रिंकू सिंग.





