Asia Cup 2023 : BCCI आणि PCB मधील वाद निवळला ? हाइब्रिड मॉडलला मंजुरी मिळाल्यास भारत पाकिस्तान भिडणार

नवी दिल्ली – पाकिस्तान आशिया चषक 2023 चे यजमानपद भूषवत आहे, परंतु या स्पर्धेबाबत बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात बराच काळ वाद सुरू आहे. नुकतंच, दोन क्रिकेट मंडळांमध्ये सुरू असलेली ही भांडणे आता दूर झाल्याचे समजते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आशिया चषक 2023 पाकिस्तानमध्ये खेळवला जाईल, परंतु स्पर्धेचे काही सामने पाकिस्तानबाहेर श्रीलंकेत देखील होणार आहेत. या स्पर्धेसाठी पीसीबीच्या प्रस्तावित हायब्रीड मॉडेलला आशियाई क्रिकेट परिषदेच्या आगामी बैठकीत मंजुरी मिळण्याची तयारी असल्याचे समजते.
13 जून रोजी आशिया कप 2023 या स्पर्धे बाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, ज्यामध्ये श्रीलंकेत आशिया कप सामने आयोजित करण्यास मान्यता दिली जाईल यामुळे स्पर्धेतील मोठा अडथळा दूर होणार आहे.
पाकिस्तानने आशिया चषकाचे एकूण 4 सामने त्यांच्या देशात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला लवकरच हिरवा सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. हे सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील. ज्यामध्ये पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामने होऊ शकतात.तर टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकेकडून आयोजित केले जाऊ शकतात. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत श्रीलंकेत पाहायला मिळू शकते.
आशिया चषक स्पर्धेसाठी प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पाकिस्तान संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने बीसीसीआयने आशिया कपसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता.यानंतर पीसीबीने एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या भारत दौऱ्यालाही नकार दिला. अशा स्थितीत आशिया चषक नवीन मॉडेलने आयोजित केल्यास पाकिस्तान संघ भारत दौऱ्यासाठी सज्ज होऊ शकतो. .





