Ashok Kharat : अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अशोक खरातशी आर्थिक व्यवहार आणि संबंध ठेवल्याच्या आरोपात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. अभिजीत भांडे हे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. अशोक खरात (Ashok Kharat) यांच्यासोबत आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आहे. भांडे आणि खरात यांच्यातील फोन कॉल रेकॉर्ड्स समोर आल्यानंतर महसूल विभागाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली. १४३ फोन कॉल्स, एकूण ३ तास चर्चा अभिजीत भांडे आणि अशोक खरात (Ashok Kharat) यांच्यात तब्बल १४३ वेळा फोनवर बोलणे झाल्याचे रेकॉर्ड समोर आले आहे. यातील ८३ कॉल्स अशोक खरातने अभिजीत भांडेला केले होते, तर ६० कॉल्स भांडे यांनी खरातला केले होते. ४ एप्रिल २०२५ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत दोघांमध्ये एकूण १०,०३७ सेकंद म्हणजे जवळपास तीन तास बोलणे झाले. यात काही विशेष दिवसही समोर आले आहेत. ७ ऑगस्ट २०२५ रोजी ११ मिनिटे बोलणे झाले होते. ७ जुलै २०२५ रोजी एकाच दिवशी १० कॉल्स तर २३ नोव्हेंबर २०२५ रोजी १४ कॉल्स झाल्याचे रेकॉर्ड आहे. या संपूर्ण पुराव्याच्या आधारे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. Ashok Kharat जमिनीतील गुंतवणूक आणि इतर आरोप अभिजीत भांडे यांनी अशोक खरात यांच्या पत्नी आणि मुलीच्या नावावर असलेल्या जमिनींमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये भांडेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यानंतर आता अभिजीत भांडे यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक खरात प्रकरणाची पार्श्वभूमी शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपात अशोक खरात यांच्यावर खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकारीही अडचणीत सापडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, “कुणालाही सोडले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला आहे. अशोक खरात प्रकरणामुळे महसूल विभागातील अनेक अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा आहे. भांडे यांच्यानंतर खरातशी संबंधित इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.