Ashish Shelar: “काँग्रेसच्या सत्ताकाळात १२ वेळा SIR प्रक्रिया राबवण्यात आली,” राहुल गांधींच्या SIR विरोधाला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर
Ashish Shelar : रोहित पवारांवरही साधला निशाणा

Ashish Shelar: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षाकडून SIR प्रक्रियेवरून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांना भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात तब्बल १२ वेळा SIR प्रक्रिया राबवण्यात आली, त्यावेळी काँग्रेसने आक्षेप का घेतले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसच्या खासदारांनी संसदेत किती वेळा प्रश्न विचारले, निवडणूक आयोगाकडे किती तक्रारी केल्या आणि BLO व BLA यांच्या माध्यमातून मतदारांना त्यांच्या अधिकारांचा लाभ मिळवून देण्यासाठी किती प्रयत्न केले, याची उत्तरे राहुल गांधी आणि काँग्रेसने द्यावीत, अशी मागणी शेलार यांनी केली.
तसेच तीन कोटी कथित अवैध मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी काँग्रेस विरोध करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही आशिष शेलार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
‘केवळ राजकीय वातावरण निर्माण करण्यासाठी रोहित पवारांची अशी वक्तव्ये’
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावरून थेट मफरलमॅन म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला. यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. यावरुन देखील आशिष शेलार यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना कोणताही ठोस, सबळ किंवा परिस्थितीजन्य पुरावा नसल्याचा दावा करत, केवळ राजकीय वातावरण निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात असल्याची टीका त्यांनी केली.
रोहित पवार यांच्या वक्तव्यामागे राजकीय वैफल्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नेतृत्वाच्या प्रश्नांची पार्श्वभूमी असू शकते. पुराव्याशिवाय मुख्यमंत्र्यांवर आरोप करून राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला.





