Ashadhi Wari: आळंदीत पालखी रथाच्या मानावरून वाद; अखेर चर्चेनंतर उपोषण स्थगित, काय घडलं?
Ashadhi Wari: संस्थान समिती आणि बैलजोडी निवड समितीची तातडीने मध्यस्थी; सकारात्मक चर्चेनंतर रानवडे कुटुंबाने बेमुदत आमरण उपोषण केले स्थगित.

Ashadhi Wari – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याच्या मानावरून आळंदीत वाद निर्माण झाला असून, निवड प्रक्रियेत मनमानी झाल्याचा आरोप करत उमेश रानवडे यांनी सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण चर्चेनंतर स्थगित करण्यात आले. या वादावर 48 तासांत सन्माननीय तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन बैलजोडी निवड समितीकडून देण्यात आले. रानवडे कुटुंबाचा पालखी रथाच्या मानाबाबत दावा असून, निवड समितीने पारदर्शकता न ठेवता निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात उमेश रानवडे यांनी यापूर्वीच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीकडे निवेदन सादर करून न्याय मिळावा, अशी मागणी केली होती. गुरुवारी सकाळी उमेश रानवडे हे बैलजोडीसह महाद्वार चौकात दाखल झाले आणि त्यांनी उपोषणास सुरुवात केली. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बैलजोडीच्या उपस्थितीमुळे आणि पालखी सोहळ्याशी संबंधित विषय असल्याने या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा रंगली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आणि बैलजोडी निवड समितीने तातडीने मध्यस्थी केली. समितीच्या वतीने नंदकुमार कुर्हाडे यांनी लेखी आश्वासन देत आषाढी वारी 2026 संदर्भातील वादावर पुढील 48 तासांत चर्चा करून सन्माननीय मार्ग काढला जाईल, असे स्पष्ट केले. यानंतर उमेश रानवडे, राहुल चिताळकर, देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ड. राजेंद्र उमाप तसेच बैलजोडी समितीचे प्रतिनिधी नंदकुमार कुर्हाडे यांच्यात चर्चा झाली.
या बैठकीत सकारात्मक वातावरणात तोडगा काढण्याबाबत सहमती झाल्यानंतर उमेश रानवडे यांनी आपले बेमुदत उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बैलजोडी समितीचे बबनराव कुर्हाडे, नंदकुमार कुर्हाडे, विलास घुंडरे, रामदास भोसले, रमेश कुर्हाडे, पोलीस कर्मचारी तसेच आळंदीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
48 तासांत निर्णयाकडे लक्ष
पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान हा आळंदीतील भावनिक आणि परंपरेशी निगडित विषय मानला जातो. त्यामुळे समितीने दिलेल्या 48 तासांच्या मुदतीत नेमका काय तोडगा निघतो, याकडे वारकरी, ग्रामस्थ आणि संबंधित कुटुंबांचे लक्ष लागले आहे.




