Ashadhi Wari – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यातील रथासाठी यंदा आळंदीतील रानवडे घराण्याच्या बैलजोडीची निवड करण्यात आली आहे. माऊलींच्या रथासाठी बैलजोडी जुंपण्याचा मान परंपरेने कुर्हाडे, रानवडे, भोसले, वहिले, घुंडरे आणि वरखडे या अलंकापुरीतील ग्रामस्थांना दिला जातो. यंदाचा आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा 8 जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर बैलजोडी निवड समितीची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत प्रगतशील शेतकरी हर्षवर्धन रानवडे आणि तुळशीराम रानवडे यांच्या बैलजोडीला रथ ओढण्याचा मान देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीस बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुर्हाडे, उपाध्यक्ष शिवाजीराव रानवडे, विलास घुंडरे, नंदकुमार कुर्हाडे, रामदास भोसले आणि रमेश कुर्हाडे उपस्थित होते.दरम्यान, बैलजोडीचा मान जाहीर झाल्यानंतर समितीचे अध्यक्ष बबनराव कुर्हाडे यांच्या हस्ते हर्षवर्धन रानवडे व तुळशीराम रानवडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रानवडे कुटुंबीयांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, माऊलींच्या पवित्र रथासाठी आमच्या बैलजोडीची निवड होणे हा आमच्या कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. ही सेवा म्हणजे आमच्यासाठी केवळ मान नसून माऊलींचे आशीर्वाद आहेत. वारकरी परंपरेतील ही सेवा प्रामाणिकपणे आणि भक्तिभावाने पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहील. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथासाठी बैलजोडीचा मान मिळाल्याने रानवडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.