Ashadhi Wari 2024: हरिनाम गजरात संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान

त्र्यंबकेश्वर – सनई-चौघडे, रांगोळ्यांच्या पायघड्या… टाळ-मृदंगाचा गजर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो वारकरी, त्यांच्या हातात असलेले भगवे ध्वज आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” चा गजर करत राज्यातील मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज (दि. 20) त्र्यंबकेश्वरमधून हरिनाम गजरात आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. 16 जुलैला पालखी सोहळा पंढरपूरात पोहोचणार आहे. पहाटे पारंपारिक पूजा विधि झाल्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. यावेळी वारकऱ्यांच्या विठुरायाच्या जयघोषांनी त्र्यंबकनगरी दुमदुमली होती.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाथांच्या मंदिरासमोरुन पालखीचे प्रस्थान झाले. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचा लांब पल्ल्यांच्या पालखीमध्ये समावेश होतो. याशिवाय संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे बंधू म्हणून देखील निवृत्तिनाथ महाराज यांचे वारकरी संप्रदायामध्ये एक वेगळे स्थान असल्याने या वारीत सहभाग घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून वारकरी येतात.
असा असेल पुढील प्रवास –
आजचा (दि. 20) पहिला मुक्काम महानिर्वाणी आखाडा श्री गहिनीनाथ समाधी स्थान(गुरु गृह) पेगलवाडी, 21 जून सातपूर, 22 जून गणेशवाडी नवीन भाजी मार्केट नाशिक पंचवटी, 23 जून, पळसे, 24 जून लोणारवाडी, 25 जून खंबाळे, 26 जून पारेगांव, 27 जून गोगलगांव, 28 जून राजुरी, 29 जून बेलापूर (बु.), 30 जून राहुरी, 1 जुलै डोंगरगण, 2 जुलै नगर, 3 जुलै अहमदनगर येथे श्री निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा होईल (सकाळी 10 ते 12) मुक्काम नगर येथेच असेल. 4 जुलै साकत, 5 जुलै घोगरगांव, 6 जुलै मिरजगांव, 7 जुलै कर्जत, 8 जुलै कोरेगांव, 9 जुलै रावगांव, 10 जुलै जेऊर, 11 जुलै कंदर, 12 जुलै दगडी अकोले, 13 जुलै करकंब, 14 जुलै पांढरीची वाडी, 15 जुलै चिंचोली, 16 जुलै वाखरीतून पंढरपूरमध्ये रात्रीचा मुक्काम असेल. 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. 20 जुलैपर्यंत पालखी सोहळा पंढरपूरात श्री निवृत्तीनाथ मठात मुक्कामी असेल त्यानंतर गोपाळकाला करून पालखी परतीच्या मार्गाने निघेल.





