वारकऱ्यांच्या मदतीला ‘आषाढी वारी 2023’ मोबाइल ऍप

पुणे – आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सोयी-सुविधांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने “आषाढी वारी 2023′ हे मोबाइल ऍप विकसित करण्यात आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या पुढाकाराने 2017 पासून या ऍपच्या माध्यमातून वारकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे.
आषाढी वारी 2023 हेसऍप वारकऱ्यांनी डाउनलोड करुन घ्यावे. तसेच भाविकांनी वारीदरम्यान काही अडचण, समस्या आल्यास या ऍपवरील संबंधित संपर्क अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. या ऍपद्वारे वारकऱ्यांना पालखीशी संबंधित प्रशासनाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थापनाची माहिती घेता येणार आहे. तसेच ऍप वापरणे शक्य नसणाऱ्या वारकऱ्यांसाठी पालखी सोहळ्याच्या नियोजनातील अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि इतर माहिती पुस्तिकेच्या दोन हजार प्रतींची छपाई करण्यात आली असून त्याचे वाटप केले जाणार आहे.
अशा आहेत सुविधा
पालखी सोहळ्याशी संबंधित विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकदेखील या उपयोजनमध्ये देण्यात आले आहेत. वारकऱ्यांसाठी गुगल प्ले-स्टोअवर हे ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. एखादी व्यक्ती दिंडीमध्ये हरवली, तर आपण यांना पाहिलत का? या पर्यायाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा शोध घेता येणार आहे. वारकऱ्यांना होणाऱ्या असुविधांबाबत या ऍपच्या माध्यमातून तक्रार देखील करता येणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.
ऍपमध्ये असणार ही माहिती
या ऍपमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गाचे वेळापत्रक, गावनिहाय नकाशा, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या थेट दर्शनाची (लाइव्ह) सोय, पालखीचे विश्वस्त आणि पालखी सोहळा
प्रमुख यांचे संपर्क क्रमांक, वैद्यकीय सुविधा त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकरी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पाण्याच्या सुविधेच्या दृष्टीने मार्गावरील टॅंकर सुविधा, अन्न पुरवठा आणि वितरण, विद्युत सेवा, पशुधन आदी सेवेसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत, असे प्रशासनाने सांगितले.



