‘आशा’मुळे अल्पवयीन पीडितेला आशेचा किरण

पुणे– आईबरोबर झालेल्या भांडणातून घर सोडलेले आणि मित्राकडून परक्या शहरात झालेला अत्याचार यामुळे जायचे कोठे आणि विश्वास कोणावर ठेवायचा, अशा कचाट्यात एक अल्पवयीन मुलगी सापडली. ती पुणे रेल्वे स्थानकावर विमनस्क अवस्थेत भटकत होती. कोणाच्या वाईट नजरेत पडण्याआधीच ती एका आशा वर्करच्या नजरेस पडली अन् तिच्या आयुष्यात एक आशेचा नवा किरण सापडला…
पुणे रेल्वे स्थानकावर एका आशा वर्करला भयभीत अवस्थेत फिरत असलेली अल्पवयीन मुलगी दिसली. ती एरवी रेल्वे स्थानकावर भटकणाऱ्या मुलांसारखी नव्हती. यामुळे तिने आस्थेने चौकशी केली असता, मुलीने घरात आईशी भांडणे झाल्याने मुंबईवरून पुण्यात आल्याचे सांगितले. मात्र, तिच्या बोलण्यावरून तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडल्याची शंका आशा वर्करच्या मनात आली. तिने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून मुलीला दादरला जाणाऱ्या गाडीत बसवून दिले.
तेथे गेल्यावर तिला एका स्वयंसेवी संस्थेत दाखल करण्यात आले. तिथे तिची वैद्यकीय चाचणी केली असता, अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर मुलीची चौकशी केली असता, अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. यासंदर्भात माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हा नांदेड सिटी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
नांदेड सिटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी १६ वर्षांची असून, मुळची माटुंग्याची आहे. तिच्या घरी तिची आई असून, ती दिवसभर कामावर जाते. दरम्यान, तिची ओळख चेंबूर येथे राहणाऱ्या ऋषी पठार याच्याशी झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ही बाब आईला समजल्यावर पीडितेचे आईबरोबर वाद झाले. यामुळे तिने ऋषीला फोन करून सांगितले. त्याने एके दिवशी तिला दादर स्टेशनला बोलावून आपण पुण्याला जाऊन लग्न करू, असे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर तिला तिच्या किरकटवाडी येथे राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी आणले. तेथे त्याने पीडितेवर अत्याचार केले आणि तो पळून गेला.
आईशी झालेल्या वादामुळे परत घरी जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यातच आईला अत्याचार झाल्याचे कळल्यावर तिच्या रागाला सामोरे जावे लागेल, या भितीनी ती विमनस्क अवस्थेत रेल्वे स्थानकावर फिरत होती. स्थानकावरील वाईट प्रवृत्तींच्या हाती लागण्याअगोदरच तिच्यावर आशा वर्करची नजर गेल्यामुळे तिला आश्रय आणि संरक्षण दोन्ही गोष्टी मिळाल्या. आता स्वयंसेवी संस्था तिचे समुपदेश करण्याबरोबरच तिला निवारा आणि पुन्हा आईच्या हवाली करण्यासाठी हालचाल करत आहेत. दरम्यान, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणाचा शोध नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अनामिक मदतीचा हात…
आशा वर्कर ग्रामीण भागातल्या आरोग्यासाठी कार्य करतात. ते एक प्रकारे स्वयंसेवकाचे काम करतात. अशीच एक आशा वर्कर प्रवासासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. तिच्या नजरेतून पीडित मुलगीची तगमग सुटली नाही. मात्र, रेल्वे प्रशासनाने पीडितेला मदत केली; परंतु आशा वर्करचे नाव, गाव, पत्ता विचारण्याचे राहून गेले.





