Cincinnati Singles Title : ॲशी बार्टीला जेतेपद

मॅसन (अमेरिका) – टोकियो ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीनंतर जोरदार पुनरागमन करत ॲशी बार्टीने सिनसिनाटी ओपन स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद जिंकले. दुसरीकडे टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता ॲलेक्झांडर झ्वेरेवने आपली लय कायम राखत एकेरीचे जेतेपद जिंकत यूएस ओपनवरील आपला दावा अधिक मजबूत केला आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बार्टीने वाइल्ड कार्डने अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या झिल टीचमानचा 6-3, 6-1 असा सहज मिळविला. या विजयासह तिने या सत्रातील पाचवे जेतेपद आपल्या नावे केले.
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतही झ्वेरेवला विजयासाठी जास्त संघर्ष करावा लागला नाही. त्याने सातव्या मानांकित आंद्रे रुबलेवचा 6-2, 6-3 असा पराभव केला. हा सामना त्याने केवळ 58 मिनिटांत जिंकला.
गतवर्षी यूएस ओपनच्या अंतिम फेरीत डोमिनिक थीमकडून पराभूत झालेला झ्वेरेव म्हणाला, हा आठवडा माझयासाठी खूपच सुखद ठरला आहे. न्यूयार्कला जाण्यापूर्वी मिळालेला या विजयामुळे निश्चितच आत्मविश्वास वाढला आहे. हीच कामगिरी कायम ठेवण्यासाठी माझा प्रयत्न असेल, असे त्याने सांगितले.





