‘आसियान’च्या एकतेला भारतासाठी महत्वाचे प्राधान्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – “आसियान’ची एकता आणि केंद्रस्थानी असणे ही बाब भारतासाठी महत्वाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भारत आणि “आसियान’मधील मैत्रीसंबंधांना पुढील वर्षी 30 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने “2022′ हे वर्ष आसियान-भारत मैत्री वर्ष म्हणून साजरे केले जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
“आसियान’परिषदेला दूरदृश्य पद्धतीने संबोधित करताना पंतप्रधानांनी हिंद-प्रशांत सागरी पुढाकार आणि आसियानच्या हिंद प्रशांत क्षेत्राबाबतच्या धोरणांचाही उल्लेख केला. या दोन्हींच्या आधारे दोगांच्या सामायिक दृष्टीकोनाची चौकट बांधली गेली असल्याचे सांगितले.
कोविड-19 च्या साथीमुळे सर्वांनाच अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण हा आव्हानात्मक काळ एक प्रकारे भारत-आसियान मैत्रीसाठी ही कसोटीचाच होता. कोविडपूर्व काळापासूनचे परस्पर सहकार्य आणि परस्पर सहानुभूती हे भविष्यातील नात्याला बळ देत राहील आणि लोकांमधील सद्भावनेचा तो आधार असेल, असे पंतप्रधान म्हणाले.
भारत आणि आसियान सदस्य देश यांच्यात हजारो वर्षांपासूनचे घनिष्ट संबंध आहेत. आपली सामायिक मूल्ये, परंपरा, भाषा, ग्रंथ, वास्तुकला, संस्कृती, पाककृती इत्यादींमध्येही हे दिसून येते आणि म्हणूनच, आसियान संघटनेची एकता आणि केंद्रभूतता भारतासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.





