प्रकृती बिघडल्यामुळे आसाराम बापू रूग्णालयात दाखल

जोधपूर : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापू याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून तो सध्या जोधपूर येथील तुरूंगात आहे. मात्र त्याची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्याला येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. गुरूवारी रात्री १ वाजता छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला रूग्णालयात नेण्यात आले. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यत आले असून हिमोग्लोबीन कमी झाल्याचे आरोग्य तपासणीत आढळून आले आहे.
दरम्यान, आसारामच्या अधिकृत हँडलवरून त्याच्या अनुयायांनी रूग्णालयाबाहेर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने २१ मार्च रोजी जोधपूरच्याच एका खासगी आयुर्वेद रूग्णालयात पोलिसांच्या देखरेखीखाली आसारामवर १० दिवस उपचार करण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्रातून आलेल्या एका वैद्याने त्याच्यावर उपचार केले होते. आपल्याला महाराष्ट्रात खोपोली येथे उपचार करण्याची परवानगी मिळावी अशी विनंती त्याने केली होती.





