Asaduddin Owaisi : रेवंत रेड्डी यांच्या ‘त्या’ टीकेवर असदुद्दीन ओवैसी म्हणाले,”हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे आणि तो…”

Asaduddin Owaisi : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय प्रचाराला जोर आल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. रेड्डी यांच्या टीकेला उत्तर देताना,’त्यांची खाकी चड्डी आता दिसू लागली आहे, जेव्हा ते आमच्याविरुद्ध जिंकू शकत नाहीत तेव्हा ते आमच्या कपड्यांवर आणि आमच्या दाढीवर प्रश्न विचारायला लागतात.’असे म्हणाले.
एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवैसी म्हणाले, “काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक नाही, हे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत. रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात ABVP मधून केली, त्यानंतर ते TDP चे सदस्य होते आणि नंतर काँग्रेसमध्ये सामील झाले, एक प्रकारे ते RSS चे कठपुतळी आहेत.”असे म्हणत रेड्डी यांच्यावर टीका केली.
पुढे बोलताना ओवेसी म्हणाले, जर तुम्ही कपड्यांवर निशाणा साधत असाल तर तुम्हाला माहित आहे की तुम्ही शेरवानी आणि टोपी घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार करता. या निवडणुकीत टोपी आणि शेरवानी घातलेले लोक आरएसएसच्या या अण्णांना सांगतील की जो आमच्या कपड्यांवर हल्ला करतो तो आमचा द्वेष करतो. तुमच्या या विधानांमुळे आमच्यावर हल्ले सुरू झाले असते. हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे आणि तो असा चालू शकत नाही. असे म्हणत रेड्डी यांना त्यांनी इशारा दिला.
रेवंत रेड्डी ओवेसीबद्दल काय म्हणाले?
तेलंगणाचे प्रमुख रेवंत रेड्डी यांनी असदुद्दीन ओवैसींवर निशाणा साधताना ओवैसी आरएसएसच्या शेरवानीमध्ये शॉर्ट्स घालतात, असे म्हटले होते. ओवेसी म्हणाले, “रेवंत यांचे हे विधान CAA (नागरिकत्व सुधारणा कायदा) निषेधाच्या वेळी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या विधानासारखेच आहे. ते म्हणाले, पीएम मोदी म्हणाले होते की, आंदोलकांना त्यांच्या कपड्यांवरून ओळखता येते.”





