नवी दिल्ली : एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ओवैसी सातत्याने पाकिस्तानवर टीका करत आहेत. पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालतो. आणि हे त्यांनी वारंवार सिद्ध केल्याचे ओवैसी सांगतात. पाकिस्तान हा मानवतेसाठी धोका ठरतो आहे. यामुळेच अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी जात आहेत आणि हे खपवून घेतले जाणार नाही, हे भारताला आता आंतरराष्ट्रीय समुदायाला हे दाखवून द्यावे लागेल, असे ओवेसी शनिवारी एका मुलाखतीत म्हणाले. मुहम्मद झिया-उल-हक यांच्या काळापासून ते कंदहार विमान अपहरण, 26/11 चा दहशतावादी हल्ला, संसदेवरील हल्ला, उरी, पठाणकोट, रियासी आणि आता अगदी पहलगाममध्ये पर्यटकांवरील निर्घृण हत्येपर्यंत पाकिस्तानची भूमिका स्पष्टपणे दिसली आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा (डीप स्टेट) आणि इसीस भारतात अस्थिरता पसरवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. 1947 पासून ते हेच करत आहेत आणि भविष्यातही हेच करत राहतील, असे ताशेरे ओवेसींनी पाकिस्तानवर ओढले. ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादाबाबत भारताची भूमिका काय असेल, ती जागतिक पातळीवर मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय सदस्यांची 7 शिष्टमंडळे केली आहेत. त्यातील एका पथकात असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश आहे. जागतिक व्यासपीठावर भारताची दहशतवादविरोधी भूमिका जोरदारपणे मांडणे हेच या शिष्टमंडळाचे उद्दिष्ट आहे. आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले, “हे कोणत्याही पक्षाबद्दल नाही तर भारताबद्दल आहे. मी ही जबाबदारी गांभीर्याने निभावेन. मी माझ्या देशासाठी योग्य तेच करेन. पाकिस्तान स्वतःला इस्लामिक राष्ट्र म्हणून जगासमोर सादर करत आहे हे योग्य नाही. भारतात सुमारे 20 कोटी मुस्लिम राहतात. पाकिस्तानचा हा दावा किती मूर्खपणाचा आहे. हे जगाला सांगणे देखील महत्त्वाचे आहे.