Asaduddin Owaisi : मक्का आणि मदिना येथे अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंना मायदेशी आणा; ओवेसींची केंद्राकडे मागणी
अडकलेल्या यात्रेकरूंना भारतात परत आणण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना मोठ्या क्षमतेच्या विमानांद्वारे सेवा चालवण्याची परवानगी द्यावी, असे ओवेसी यांनी (Asaduddin Owaisi) म्हटले आहे.

Asaduddin Owaisi : सौदी अरेबियातील सुरक्षा परिस्थितीमुळे विमान कंपन्यांनी उड्डाणे स्थगित केल्याने मक्का आणि मदिना येथे भारताचे सुमारे ४,००० यात्रेकरू अडकले आहेत. या यात्रेकरूंच्या सुरक्षित मायदेशी परतीसाठी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी गुरुवारी केंद्र सरकारकडे तातडीने मदत करण्याची मागणी केली.
अडकलेल्या यात्रेकरूंना भारतात परत आणण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना मोठ्या क्षमतेच्या विमानांद्वारे सेवा चालवण्याची परवानगी द्यावी, असे ओवेसी यांनी (Asaduddin Owaisi) म्हटले आहे. तसेच, नियमित विमानसेवा सुरू होण्यास विलंब होत असल्यास यात्रेकरूंच्या परतीसाठी विशेष विमानांची व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इतर संबंधित केंद्रीय मंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, असे आवाहन ओवेसी यांनी केले. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला आणि त्यांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
भारतीय यात्रेकरूंना त्यांच्या ट्रॅव्हल एजंट्सनी वाऱ्यावर सोडले आहे. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. यात्रेकरू भारतात परत येईपर्यंत त्यांना आवश्यक ती मदत आणि सुविधा पुरवण्यात याव्यात, असे ओवेसी यांनी म्हटले.
या संदर्भातील सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना टॅग केले आहे. अडकलेल्या यात्रेकरूंच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने त्वरित समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी (Asaduddin Owaisi) व्यक्त केली.






