मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध: रोहित पवारांची संजय शिरसाटांवर टीका, ‘इंच इंच हिशोब…’

मुंबई: शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी नुकतेच राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. शिरसाट यांची ही भूमिका म्हणजे, “मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध” लागल्याचा स्पष्ट आरोप पवार यांनी केला.
शिरसाट यांनी ‘आता थांबलं पाहिजे, १० वर्ष नगरसेवक आणि २० वर्ष आमदार आहे’ असे विधान करत निवृत्तीचे संकेत दिले होते. यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी शिरसाटांच्या सिडकोतील कथित गैरव्यवहारांवर बोट ठेवलं.
मा. संजय शिरसाठ साहेब सिडकोत मलिदा खाताना कुठंतरी थांबावं असा विचार का आला नाही? आता मंत्रीपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. भूमिपुत्रांचा हक्क डावलून सिडकोची हजारो कोटी रुपयांची जमीन बिवलकर कुटुंबाच्या आणि खासगी बिल्डरांच्या घशात घालणारी आपल्यासारखी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 25, 2025
पवार म्हणाले, “संजय शिरसाट साहेब सिडकोत मलिदा खाताना कुठंतरी थांबावं असा विचार का आला नाही?” भूमिपुत्रांचा हक्क डावलून सिडकोची हजारो कोटी रुपयांची जमीन खासगी बिल्डरांच्या घशात घालणाऱ्या व्यक्तीने राजकारणात राहणे म्हणजे लोकांचे नुकसानच होणे आहे, असे ते म्हणाले.
शिरसाट यांनी वय पुढे करून पळ काढू नये, असे आव्हान देत पवार यांनी “सरकारची ५-६ हजार कोटी रुपयांची जमीन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा इंच इंच हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल! आता सुट्टी नाही,” अशा शब्दांत त्यांचा समाचार घेतला.
दरम्यान, शिरसाट यांनी आपण ‘अल्पसंतुष्ट’ असून वयाच्या ६४ व्या वर्षी भविष्याचा विचार करून निवृत्तीचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.




