पुणे | तब्बल २८ लाख आधार कार्ड “अपडेशन’च्या प्रतीक्षेत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ज्या नागरीकांनी 2012 पूर्वी आधार कार्ड काढलेले आहे, परंतु मागील 10 वर्षांमध्ये अद्ययावत (अपडेट) केलेले नाही, अशांनी त्यांचे आधार अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये आधार अपडेटची मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली. मागील दीड वर्षांत सुमारे 1 लाख नागरिकांनी आधार अद्ययावत केले आहे. अजूनही पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागातील सुमारे 28 लाख नागरिकांचा आधार तपशील अद्ययावत करणे बाकी आहे.
केंद्र आणि राज्य सरकारी योजना, लाभ यांसह रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, मोबाइलचे सिमकार्ड घेणे किंवा अद्ययावत करणे, बॅंक खाते उघडण्यापासून सर्व ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डची मागणी केली जाते. आधारवरील लिंग, नाव, पत्ता, छायाचित्र आदींमध्ये बदल झाल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असते. मात्र, दर दहा वर्षांनी आधार अद्ययावत करावे लागते, ही बाब नागरिकांना अद्याप माहिती नाही.
कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावरही माहिती अद्ययावत करता येते. मात्र, आधार अद्ययावतीकरण ऐच्छिक असल्याचे जिल्हा प्र्शासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे यासाठी नागरिक पुढे येत नाही. देशातील 40 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असून त्यापैकी पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.
आॅनलाइन सुविधाही उपलब्ध
ज्या नागरिकांनी दहा वर्षांपूर्वी आधार काढले आहे. अशा नागरिकांनी पत्ता, मोबाइल क्रमांक, तसेच बोटांचे ठसे आदी अद्ययावत करून घ्यायचे आहे. शहरातील आधार सेवा केंद्र, टपाल कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी आधार अद्ययावत करता येईल. माय आधार संकेतस्थळावरही ऑनलाइन पद्धतीने अद्ययावत करता येत आहे.





