महाराष्ट्र हादरला…! शाळेतील कर्मचाऱ्याकडून तब्बल १० विद्यार्थीनींचा विनयभंग

Akola Crime News : अकोला शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील कौलखेड भागातल्या एका शाळेत एका कर्मचाऱ्याने तब्बल दहा चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटनाउघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून हेमंत विठ्ठल चांदेकर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
या शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी ५ मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. यावेळी शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या हेमंत चांदेकर या आरोपीने परिस्थितीचा गैरफायदा घेत इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थिनींचा विनयभंग केला. शाळेतील शिक्षिका प्रशिक्षण आटोपून आल्यानंतर या मुलींनी घडलेला सर्व प्रकार शिक्षकांना सांगितलं.
यानंतर शिक्षकांना संताप अनावर झाला. त्यांनी कर्मचाऱ्याने केलेल्या कृत्याची माहिती शाळेच्या संचालकांना दिली. संचालकांनी या प्रकाराची तक्रार लगेच चाईल्ड हेल्पलाइनला केली. याप्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या आरोपी चांदेकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.
शिक्षकाकडून तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
गेल्या तीन महिन्यांपासून एक शिक्षक शाळेतील तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. लातूर शहरापासून नजीक असलेल्या एका सरकारी विद्यालयात ही घटना घडली आहे. नराधम शिक्षकाने तीनही विद्यार्थ्यांना धमकी दिली होती. आणि तो त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे एकीकडे मुली सुरक्षित नसताना आता लहान मुलांच्या सुरक्षेचाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.





